पुण्यातील गिरीप्रेमींनी केली राजगडावर ‘स्वच्छता’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर इन्स्टिट्यूटच्या सदस्यांनी रविवारी राजगडावर पद्मावती देवीची पूजा केली, दुर्ग पूजा केली आणि स्वच्छता अभियान राबविले. राज्यात सर्वच गट-कोटांवर याच दिवशी दुर्ग पूजा करण्यात आली.

 

नुकताच शिवजयंती उत्सव राज्यात पार पडला. अनेक शिवभक्तांनी राजगडावर गर्दी केली होती. गर्दीच्या दरम्यान गडावर विविध प्रकारचा कचरा साठला होता. ‘सह्याद्रीच्या’ बारा स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी हा कचरा काढून गड स्वच्छ आणि नेटका केला. तसेच गडावरती पर्यटकांसाठी विविध सूचनांचे फलक लावले आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. या सर्व मोहिमेत देवार्थ हंडे हा साडेतीन वर्षांचा मुलगा उत्साहात सामील झाला होता.

राजगडावर एकच स्थानिक रखवालदार आहे. गडाचा मोठा आवाका पाहता आणि अलीकडील काळातील पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता रखवालदाराला दोन सहाय्यक देणे गरजेचे आहे अशा मागणीचे निवेदन इन्स्टिट्यूटच्या वतीने पुरातत्व खात्याला देण्यात आले.