‘भाऊ’ कि ‘दादा’, भाजपच्या इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील यांची वर्णी लावून पुण्याची सूत्रे त्यांच्याकडे सोपविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे आता विधानसभेसाठी पुण्यातून इच्छुक असलेल्यांची धाकधूक वाढली आहे. विधानसभेसाठी ‘फिल्डिंग’ कुणाकडे लावायची यावरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

पुण्यातील मंत्री गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी दिली. आता ते खासदार म्हणून निवडून गेल्याने त्यांनी आपल्या आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानुसार गिरीश बापट यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खात्यासह अन्न व औषध प्रशासन ही खाते जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली आहेत. तर बापटांकडे आणखी एक असलेले संसदीय कामकाज खाते शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सूत्रे आल्याने बापट समर्थक असलेल्या इच्छुकांची अवस्था बिकट झाली आहे. भाजपमध्ये गटबाजी आता संपुष्टात आली असली तरी त्यामागे केवळ मोदी सरकार हे एकमेव कारण आहे मात्र यापूर्वी भाजपमध्ये असलेले गटा -तटाचे राजकारण अजूनही छुप्या पद्धतीने सुरु आहे.

पालिकेवर एकहाती सत्ता हस्तगत केल्यानंतर भाजपमधील एका गटाच्या नगरसेवकांना सदैव डावलण्याचे राजकारण आणि गत विधानसभा निवडणुकीत झालेले कुरघोडीचे राजकारण पाहता यंदा विधानसभा निवडणुकीतही कुरघोडीचे राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.मात्र त्यात यंदा बापट समर्थकांची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. जरी आमच्यात कोणतेही मतभेद आणि गटबाजी नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात चित्र उलटे आहे. केवळ छुप्यारितीने गटबाजीतुन ‘बेरजेचे समीकरण ‘ होत आहे. एका गटाच्या जवळपास ३१ नगरसेवकांना यापूर्वी ‘अलिप्त’ ठेवण्याचे कारस्थान आता उलटणार आहे. जरी ‘भाऊ’चा कारभार ‘दादा’कडे गेला असला तरी शहराच्या राजकारणात स्वतःचे अल्पावधीत वर्चस्व निर्माण करणारे खासदार संजयनाना काकडे यांचे महत्व पुन्हा वाढणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनीही ‘रिंगणात ‘ उतरण्याची तयारी चालवली होती. इतकेच काय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही त्यांनी साकडे घातले होते. काँग्रेसमधून त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारीही दर्शवली होती . मात्र मुख्यमंत्र्यांनी काकडे यांना थोपवून धरल्याने लोकसभेतील मतांच्या ‘फुटीचा डाव’ टाळता आला. कारण ३१ पेक्षा अधिक नगरसेवक हे ‘नानां’च्या गोटातील आहेत.

त्यामुळे ‘भाऊ’च्या कारभाराला शह देऊन शहरावर वर्चस्व मिळविण्यासाठी नानांचे समर्थक सक्रिय होते ; पण मुख्यमंत्र्यांशी खास संबंध असणाऱ्या ‘नानां’नी ऐनवेळी एक पाऊल मागे घेऊन भूमिका बदलली . त्यात यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या ‘त्या’ वादामुळे ‘एका दगडात’ च्या धर्तीवर पालकमंत्रीपदाची धुरा चंद्रकांत पाटील यांच्याकडे देतानाच संजयनाना काकडे यांची शक्ती वाढवली जाणार आहे.त्यामुळे ‘भाऊ’ना मानणाऱ्या आणि विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांची कोंडी झाली आहे. आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘भाऊ’ कि ‘दादा ‘हा संभ्रम निर्माण झाला असून ‘नानां’ची शिफारस आणि ताकद कशी मिळेल हा पेचही निर्माण झाला आहे. ‘भाऊ’ कारभारी झाले ;पण नानांचे मनसुबे पूर्ण नाही झाले, आता ‘दादा’ कारभारी बनले आहेत. त्यामुळे ‘नाना’ येत्या विधानसभेला कोणती भूमिका घेतात, याकडेच भाजपेयींचे लक्ष लागले आहे. तूर्तास ‘तिकिटा’साठी कुणा- कुणा कडे ‘वशिला’ लावायचा याच संभ्रमात इच्छुक असून येत्या विधानसभेला उमेदवारीत ‘बदल’ घडला तर काय ? या चिंतेने विद्यमान आमदारांनाही ग्रासले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही