गिरीश बापटांना बेसिक नॉलेजही नाही काय ? ; बापट झाले ट्रोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ‘मिशन शक्ती’बाबत केलेल्या विधानामुळे त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. ‘मिशन शक्ती’ अंतर्गत भारताने शत्रूचा टेहाळणी करणारा उपग्रह नष्ट केला आहे’, असं अजब विधान त्यांनी केलं होतं. गिरीश बापट विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरातून यंदा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत त्यामुळे ते अधिकच ट्रोल होताना दिसले.

काल भारताने तयार केलेल्या अँटी सॅटेलाइट मिसाइलने परीक्षणासाठीच तयार केलेल्या भारतीय उपग्रहाचाच नाश केला. या मोहिमेला ‘मिशन शक्ती’ हे नाव देण्यात आले. बुधवार (दि २७ मार्च) ही मोहिम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मोहिम फत्ते झाल्याची घोषणा केली. मोदींनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे या कामगिरीबद्दल अभिनंदनही केले. परंतु, मोदींचे म्हणणे नीट न ऐकता आणि कोणत्याही डीआरडीओच्या शास्त्रज्ञांशी चर्चा न करता किंवा मीडियाचे रिपोर्ट न वाचता गिरीश बापट यांनी निर्धोकपणे फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केली. शत्रू राष्ट्राच्या टेहाळणी करणाऱ्या उपग्रहाचा भारताने नाश केला असा जावईशोधच त्यांनी लावला. त्यांच्या या पोस्टनंतर सोशलवर बापटांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली. अनेकांनी त्यांच्या अज्ञानांवर बोटंही ठेवलं तर काहींनी बापटांना बेसिक माहितही नाही असं म्हणत, ट्रोल केलं. यानंतर आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर मात्र, बापट यांनी ही पोस्ट लगेचच सोशल मीडियावरून डिलीट केली.

Girish-bapat

दरम्यान, त्यांच्या चुकीमुळे विरोधकांनीही गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्यावर टीका करताना मनसे नेते सुधीर धावडे म्हणाले की, ” पुणेकरांनो तुम्ही अशा माणसाला निवडून देणार का ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनीही बापटांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “भाजप नेते प्रसिद्धीसाठी हपापले असून खऱ्या-खोट्याची तपासणीही करत नाहीत.”

पुणे शहर हे विद्यावंतांचे माहेरघर मानले जाते. गिरीश बापट हे १९८३ पासून पुण्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. आतापर्यंत चारवेळा ते कसबा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. बीएमसीसीसारख्या नामवंत कॉलेजमधून त्यांनी बीकॉमची डिग्री मिळवली आहे.