तर ‘त्या’ दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार : गिरीश बापट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या कर्णबधीर व मूकबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या प्रकरणाची सात दिवसांत चौकशी केली जाईल. त्यातील दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे संसदीय कार्यमंत्री, पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत सांगितले.

दरम्यान, यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत निवेदन केले. ते म्हणाले, राज्यातील कर्णबधीर व मूकबधीर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काही प्रमुख मागण्यांची पूर्तता केली आहे. मूकबधीरांच्या उच्च शिक्षणाकरिता उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याची मागणी होती. सध्या पाच विभागात ही विद्यालये सुरु असून लातूर आणि नाशिक विभागात उच्च माध्यमिक विद्यालय सुरु करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यालय सुरु करण्याबाबत सक्षम संस्थेला मान्यता देताना कर्णबधीर व मूकबधीर संघटनेच्या प्रतिनिधींचे मत विचारात घेतले जाईल. तसेच पदांच्या निश्चितीसाठी असलेल्या तज्ज्ञ समितीमध्ये या संघटनेच्या दोन प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य शासकीय विद्यालयांमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. दिव्यांगांकरिता शासकीय नोकरीसाठी आरक्ष‍ित पदांवर अंध, मूकबधीर, अस्थिव्यंग उमेदवार उपलब्ध झाल्यास आणि तो पात्र ठरल्यास त्यामधून अंध, मूकबधीर प्रवर्गातील उमेदवारास नियुक्ती देताना प्राधान्य दिले जाईल. मूकबधीर व्यक्तीस सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने पात्र ठरविल्यानंतर त्याला वाहनचालक परवाना देण्यात येईल. मूकबधीर प्रवर्गातून नियुक्ती झालेल्यांची बेरा तपासणी करण्याबाबत सामान्य प्रशासन व आरोग्य विभागामार्फत आठ दिवसात परिपत्रक काढले जाईल. अन्य मागण्यांसंर्भात हे अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाईल, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.