अजित पवारांचे आव्हान गिरीश महाजनांनी स्विकारले  

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन- बारामतीची नगरपालिका जिंकण्यावरून गिरीश महाजन विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. या सामन्यात गिरीश महाजनांचे वक्तव्य अजित पवारांनी उचलून धरून त्यांच्या घरच्या मैदानावर गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. बारामती एका दिवसात जिंकण्याची भाषा करणाऱ्या लोकांनी बारामतीला येऊन बारामती जिंकून दाखवावी असे आव्हान अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना केले आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी गिरीश महाजनांचे जुनेच वक्तव्य उचलून धरले आहे आणि त्या वक्तव्याच्या आधारावर त्यांच्यावर टीका केली होती. बारामतीचे नेतृत्व पवार साहेबांनी २३ वर्ष केले आहे आणि मागील २७ वर्षापासून या ठिकाणी मी नेतृत्व करत आहे. बारामतीच्या लोकांचे आमच्यावर प्रेम आहे आणि त्याठिकाणी तुम्ही येऊन निवडणुका जिंकणे सोपे नाही असे अजित पवार  म्हणाले होते.

गिरीश महाजन काय म्हणाले ?

जामनेर नगरपालिके सारखे १७ पैकी १७ जागा एकाच पक्षाला मिळण्यासारखी बारामतीची स्थिती नाही. अजित पवारांचे आव्हान मी स्वीकारत असून येत्या काळात बारामती नगरपालिकेची निवडणूक पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून माझ्या ताब्यात दिली तर तिथे हि आपण भाजपचा झेंडा फडकवू असे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले असून त्यांनी अजित पवार यांना प्रतिआव्हान दिले आहे.

गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून अत्यंत कमी काळात समोर आलेले नेते आहेत. त्यांनी जळगाव आणि धुळे येथील महानगर पालिका भाजपच्या नावावर केल्या असून त्यांचा महानगरपालिका जिंकण्याचा चांगलाच हातकंडा आहे. त्याच प्रमाणे नगर मध्ये राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक फोडण्याचा करिश्मा हि महाजनांच्याच रणनीतीचा भाग होता. नगरच्या महापौर निवडीच्या वेळी हि गिरीश महाजन जातीने नगरमध्ये हजर होते.