गिरीश महाजन पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याची चर्चा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपने पुन्हा बहुमत मिळवत सर्वाधिक ३५२ जिंकल्या. त्यात पुण्यातून विद्यमान मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे लोकसभेवर निवडून गेल्याने आता हे पालकमंत्रिपद कुणाच्या पदरात पडणार ? यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. यात पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कुणाला हे पद मिळणार हे पाहावे लागणार आहे.

मात्र, या सगळ्यात हे पालकमंत्रीपद जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्गत धुसपूसीमुळे हा निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे आगामी मंत्री मंडळांच्या विस्तारात पुण्यातील आमदारांचा नंबर लागण्याची शक्यताही धुसर समजण्यात येत आहे. त्यामुळे महाजन यांच्याकडे तीन महिने या पदाचा अतिरिक्त भर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप आणि बाळा भेगडे या दोघांचेही मंत्रिपदाची स्वप्न अपुरे राहण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, आणि त्यात जगताप किंवा भेगडे यांपैकी एकाला कॅबिनेट किंवा राज्यमंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र या निर्णयामुळे त्यांना काहीच मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. आगामी विधानसभेची आचारसंहिता सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर पदभार स्विकारण्याच्या सूचना महाजनांना देण्यात आल्याचे समजत आहे.