खळबळजनक ! जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण, तरूणीचा विनयभाग अन् व्हिडीओ व्हायरल

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – पुरोगामी महाराष्ट्रात मन सुन्न करणारी धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यात एका प्रेमी युगुलाला बेदम मारहाण करून एका टोळक्याने तरुणीचा विनयभंग केला. या टोळक्याने प्रेमी युगुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ तयार केला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली असून सर्व स्तरातून संपात व्यक्त करण्यात येत आहे.

जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात फिरण्यासाठी आलेल्या एका प्रेमी युगुलास एका टोळक्याने मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. पोलिसांनी प्रेमी युगुलाला मारहाण करून तरुणीचा विनयभंग करणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे.

जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील एका तळ्याजवळ बसलेल्या प्रेमी युगुलास तीन ते चार दिवसांपूर्वी काहींनी मारहाण केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काहींनी हा व्हिडीओ पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे दिला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यासाठी पथकं रवाना केली.