home page top 1

चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यु ; पुण्यातील ‘त्या’ प्रसिद्ध डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने तेथे जंतुप्रादुर्भाव होऊन मुलीचा मृत्यु झाल्याप्रकरणी पोलिसांनी बावधन येथील रामकृष्ण क्लिनिकच्या डॉ. जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. पगारे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ सप्टेंबर सायंकाळी साडेसहा ते २६ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडला होता. ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार डॉ. जाधव यांच्या विरुद्ध आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे पालन न करता निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रज्ञा या मुलीला थंडी ताप आल्याने तिच्या वडिलांनी तिला बावधन येथील रामकृष्ण क्लिनिक येथे २४ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी नेले होते. तेथे डॉ. जाधव यांनी तिची तपासणी करुन कमरेवर इंजेक्शन दिले व गोळ्या देऊन घरी पाठविले होते. डॉ. जाधव यांनी इंजेक्शन दिल्यानंतर त्या जागी आणि उजव्या मांडीवर, उजव्या कंबरेवर व पाठीवर काळे चट्टे व फोड आल्याने तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या दिवशी दुपारी नवले हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे तिला डॉक्टरांनी आयसीयुमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी तिचा मृत्यु झाला.

जाधव यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे तिचा मृत्यु झाल्याची तक्रार प्रज्ञाच्या वडिलांनी केल्याने पोलिसांनी अभिप्रायासाठी सर्व कागदपत्रे ससून रुग्णालयाच्या अधिक्षकांकडे पाठविली. त्यांच्या समितीने पाठविलेल्या अहवालानुसार डॉ. जाधव यांनी दिलेल्या इंजेक्शनच्या जागी आणि उजव्या मांडीवर, उजव्या कंबरेवर व पाठीवर काळे चट्टे व फोड आल्याचे दिसून येते. ही लक्षणे इंजेक्शन पद्धतीने दिल्यामुळे होऊ शकतात. त्यानंतर झालेली गुंतागुंत ही इंजेक्शन दिलेल्या जागेवरुन जंतुप्रादुर्भाव झाल्यामुळे निर्माण झालेली आहे. यावरुन हलगर्जीपणा झालेला दिसून येतो असा अहवाल ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या समितीने दिला. त्यावरुन डॉ. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
You might also like