पुण्यात दातांची ‘ट्रिटमेंट’ करताना २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू ; डाॅक्टर दाम्पत्य फरार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. दाताचे दुखणे समोर आल्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या तरुणीचा अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. हा प्रकार निगडी प्राधिकरण येथील स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात घडला आहे. धनश्री जाधव (२३, रा. नेरे, मारुंजी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हलगर्जीपणा करणारे डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासणाविरुद्ध धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसात तक्रारी अर्ज दाखल केली आहे. दरम्यान, डाॅक्टर दाम्पत्य फरार झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री हीला दीड वर्षांपासून दाताची समस्या होती. ती निगडी येथील स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून ‘ट्रीटमेंट’ घेत होती. शस्त्रक्रियेसाठी ती आठ दिवसापासून रूग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरु असताना अतिरक्तस्राव झाल्याने धनश्रीची प्रकृती ढासळली. अतिरक्तस्राव झाल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला. याकडे डॉक्टरांनी गांभीर्याने न पाहिल्याने धनश्रीचा मृत्यू झाल्याची लेखी तक्रार आई वडिलांनी निगडी पोलिसांकडे केली आहे. मात्र, धनश्रीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर काही तरी उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले.