बँकेच्या मुलाखतीला जाताना तरुणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका तरूणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी भीलगाव नाक्याजवळ घडला. अर्पिता उर्फ अपराजीता नरेंद्र बोरकर (वय-२१) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला तर संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड केली.

अर्पिता नागरपूरमधील एका बँकेत सेल्स एक्झिकेटिव्ह पदाच्या मुलाखतीसाठी जात होती. भीलगाव नाक्याजवळ पाठिमागून येणाऱ्या ट्रकची धडक तिच्या दुचाकीला बसली. या धडकेत ती रस्त्याच्या कडेला फेकली गेली. तिच्या पोटात आणि डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेनंतर ट्रक चालक संधू (कामठी रोड, खैरी बस स्टॉप) ट्रक सोडून पळून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
You might also like