Lockdown मुळं त्रस्त अल्पवयीन मुलीनं थेट गाठले पुणे; तरुणाच्या अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळं सुखरूप नातेवाइकांच्या ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमध्ये घरात बसून त्रस्त झालेल्या मध्य प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीने अचानक घर सोडून पुणे गाठले. मात्र, पुण्यात आल्यानंतर तिला आई-वडिलांची आठवण सतावत असल्याने ती प्रचंड घाबरली. अशा अवस्थेत एका सतर्क तरुणाने मुलीला घेऊन वाकड पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी तिला सुखरूप नातेवाइकांच्या ताब्यात दिले. याबद्दल अल्पवयीन मुलीचा भाऊ आणि वडिलांनी वाकड पोलिसांचे आभार मानले आहेत.

सोपान किसनराव पौळ (वय 21, रा. काळाखडक, वाकड) या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीला वाकड पोलीस ठाण्यात आणून सोडले. मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. मला आई-वडिलांकडे सोडा, असे म्हणत ती रडत होती. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. ती मध्य प्रदेशमधील खंडवा येथील असल्याचे सांगितले. लॉकडाउनमध्ये घरातच होते, त्यामुळे वैताग आला होता. म्हणून कोणालाही न सांगता फिरण्यासाठी म्हणून पाच हजार रुपये गुपचूप घेऊन एकटीच 21 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता खंडवा येथून बसने निघाले आणि 22 नोव्हेंबर रोजी सकाळी दहाला पुण्यात उतरल्याचे उत्तर मुलीने पोलिसांना दिले.

पोलिसांनी तिच्याकडून तिच्या भावाचा संपर्क क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क केला. दरम्यान मुलीचे आई, वडील आणि भाऊ खंडवा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेल्याचे समोर आले. वाकड पोलिसांनी खंडवा पोलिसांशी संपर्क साधला. मुलगी सुखरूप असल्याचे त्यांना सांगितले. मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या पुण्यातील नातेवाइकांना वाकड पोलीस ठाण्यात पाठवले. पुण्यातील नातेवाइकांची ओळख पटल्यानंतर वाकड पोलिसांनी मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान, मुलीने एक मोबाईल फोन घेतला होता. मोबाईल दुकानदाराची माहिती काढून मोबाईल परत करून मुलीला तिचे पैसेही पोलिसांनी परत मिळवून दिले. वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास मडके व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. याबद्दल पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार यांनी पथकाचे कौतुक केले आहे.