तब्बल २ वर्षानंतर चिमुकलीची आईशी भेट

पोलीस आयुक्त आणि वाकड पोलिसांचे न्यायाधीशांकडून कौतुक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – घरगुती वादातून दोन वर्षांच्या मुलीला घेऊन जाणाऱ्या बापाला वाकड पोलिसानी तब्बल दोन वर्षाने शोधून न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी ‘त्या’ मुलीला संभाळण्यासाठी आईकडे देण्याचे आदेश दिले. त्यामुळे कौटुंबिक वादातून ताटातुट झालेल्या माय-लेकींची दोन वर्षांनी भेट झाली. मुलीला आणि तिच्या वडिलांना उत्तराखंड येथून ताब्यात घेणाऱ्या वाकड पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचे न्यायाधीशांनी कौतुक केले.

रहाटणी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद झाले. २०१७ मध्ये वडिलांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने आईच्या ताब्यातून नेले. याबाबत पत्नीने पतीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, मुलांचा ताबा कोणाकडे असावा, याबाबत पोलीस निर्णय घेऊ शकत नसल्याने हे प्रकरण दप्तरी दाखल केले. मुलीच्या आईने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायालयाने वेळोवेळी पती आणि त्यांच्या नातेवाइकाला न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स काढले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे न्यायालयाने मुलीला शोधून काढून आपल्यासमोर हजर करा, असे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी मुलीच्या वडिलांची माहिती घेतली असता ते कोलकता येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोनवेळा पोलिसांचे पथक गेले होते. मात्र, पोलीस आल्याची कुणकूण लागताच मुलीच्या वडिलांनी तिथून पोबारा केला.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे आणि त्यांचे पथक २२ एप्रिल रोजी कोलकता येथे गेले. मात्र यावेळीही पोलीस आल्याची कुणकूण लागल्याने मुलीचे वडील मुलीला घेऊन रूषीकेश येथील आश्रमात गेले. पोलिसांनी तेथील माहिती काढून मुलगी आणि तिच्या वडिलांना २७ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. ३० एप्रिल रोजी मुलगी आणि तिच्या वडिलांना मुंबई उच्च न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने मुलीला आईच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले अन तब्बल दोन वर्षांनी मुलगी आईच्या कुशीत विसावली. वाकड पोलिसांनी केलेल्या या कौशल्यपूर्ण तपासासाठी पोलीस आयुक्तांनी बक्षीस द्यावे, असे पत्र उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहे.

Loading...
You might also like