धक्कादायक ! ‘या’ कारणासाठी मुलीनेच बाॅयफ्रेंडच्या मदतीने केला आई-वडिलांचा खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर मधील वाडी परिसरातील सुरक्षानगरमध्ये राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून चंपाती दाम्पत्याची हत्या त्यांच्या मुलीने बॉयफ्रेन्डच्या मदतीने केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

पोलिसांनी चंपाती यांची २५ वर्षांची मुलगी प्रियांका आणि तिचा २६ वर्षाचा बॉयफ्रेंड इकलाख खान या दोघांना अटक केली आहे. त्यांचा एक मित्र फरार झाला आहे. शंकर आणि सीमा चंपाती यांच्या संपत्तीसाठी या तिघांनी कट रचून त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

नागपूरातील वाडी परिसरातील सुरक्षा नगर येथे राहणारे शंकर चंपाती (वय ७३) आणि सीमा चंपाती (वय ६५) या दाम्पत्याची दोन दिवसांपूर्वी हत्या झाली होती. घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले होते.
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरक्षानगर येथे चंपाती हे राहतात. त्यांचा दत्तवाडी चौकात नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय असून त्यांची पत्नी सीमा गृहिणी आहे. त्यांची मुलगी प्रियंका चंपाती ही खासगी नोकरी करते. प्रियंका रविवारी रात्री आठ वाजता बाहेरुन घरी आली. तेव्हा आईवडिल रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे तिला आढळून आले.

चंपाती दाम्पत्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे दिसून येत होते. घरफोडी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी हा हल्ला केला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. काही दिवसांपूर्वी शंकर यांचा अपघात झाल्याने ते जखमी झाले होते. त्यामुळे ते घरीच राहायचे. त्यावेळी एकाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची तक्रार वाडी पोलीस ठाण्यात दिली होती.

प्रियंका हिच्याकडे चौकशी करीत असताना तिच्या सांगण्यात विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्यांनी तिच्याकडे आणखी सखोल चौकशी केली. त्यात तिला हत्या झाली तेव्हा ती कोठे होती, हे सांगताना ती अडखळत होती. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या तपासात तिनेच इतर दोघांच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघड झाले.

हत्येपूर्वी रविवारी प्रियांकाने आई वडिलांना नाश्त्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या होत्या. त्यामुळे दोघांना झोप लागली. त्यानंतर तिने आपला प्रियकर इकलाख खान व त्याच्या मित्राला बोलावून घेतले. ते दोघे आल्यावर त्यांनी चाकूने दोघांचा गळा कापला आणि डोक्यावर लोखंडी रॉडने वार करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर घर उघडे ठेवून तिघे निघून गेले. पण, दिवसभर कोणीही त्यांच्या घरी न फिरकल्याने हा प्रकार उघड झाला नाही. शेवटी प्रियांका रात्री आठ वाजता घरी आली व तिने आपल्या आई वडिलांची हत्या झाल्याचा व घरातून काही रक्कम चोरीला गेल्याचा कांगावा केला. पण पोलिसांनी त्यांचा कट उघडकीस आणून प्रियांका व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

You might also like