दुर्दैवी ! फी भरण्यासाठी पैसे नसल्याने उच्च शिक्षीत तरुणीची आत्महत्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कॉलेजची फी भरण्यास पैसे नसल्याने एका उच्च शिक्षीत तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. रुपाली पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. रुपालीने ८९ टक्के गुण मिळवून बीटेकला अ‍ॅडमिशन घेतले होते. त्यासाठी तिने काही रक्कम भरली होती. मात्र उर्वरीत रक्कम मुदतीत भरता न आल्याने तिने नैराश्यातून किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

रुपाली पवार ही मुळची मोहोळ तालुक्यातील देगावची असून तिने पंजाबच्या जालिंदर शहरातील लव्हली प्रोफेशनल अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. या प्रवेशासाठी दहा हजार रुपये भरले होते. मात्र, उर्वरीत एक लाख रुपये भरण्यासाठी २० जुलै अंतीम तारीख होती. या तारखेपर्यंत तिला पैसे भरता आले नाहीत. त्यामुळे रुपालीने मंगळवारी रात्री राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.

रुपालीला शिक्षणाची आवड होती. तिला बी.टेक.मध्ये प्रवेश घ्यायचा होता. मात्र घरची परिस्थीती हालाखीची असल्याने तिच्या वडीलांकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिच्या वडिलांनी रुपालीची फी भरण्यासाठी शेती विकायला काढली होती. मात्र, शेतीला योग्य भाव मिळत नसल्याने शेती विकली गेली नसल्याने रुपालीवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –