विद्यार्थीनींना पदवी प्रमाणपत्रासह मिळणार पासपोर्ट, ‘या’ राज्य सरकारचा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन – हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यीनींना त्यांच्या पदवी प्रमाणपत्रासह पासपोर्टही मिळणार आहे. यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रांची प्रक्रिया कॉलेजमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.

‘प्रत्येक मुलीला पासपोर्ट मिळाला पाहिजे. हा पासपोर्ट विद्यार्थिनीला ती पदवीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी प्रमाणपत्रासह दिला जावा, असे सरकारचे मत आहे’, अशी माहिती खट्टर यांनी दिली. शनिवारी ‘हर सर हेल्मेट’ या रस्ते सुरक्षा संदर्भातील कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

यावेळी कर्नालमधील १०० विद्यार्थ्यांना वाहन परवाना आणि मोफत हेल्मेटचे वाटप केले. मुलांना वाहतुकीच्या नियमांसंदर्भातील माहिती व्हावी म्हणून त्यांना शिकावू परवाने देण्यात येणार आहे. मुलांना रस्ते सुरक्षेसंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना हेल्मेटचे वाटप केले. “याकडे राजकारणाच्या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये. या कार्यक्रमांचा परिणाम दिर्घकालीन होतो, त्यामुळे यातून जनजागृतीचे कार्यक्रम करणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

“देशात दिवसाला १ हजार ३०० हून अपघात होतात. त्यामध्ये अनेकदा हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या दुखापतीने प्रवाशाचा मृत्यू होतो. आपल्या राज्यातच दिवसाला १३ जण अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात. एका संशोधनामध्ये हेल्मेट घालून वाहन चालवणाऱ्या चालकाचा अपघात झाल्यास तो वाचण्याची शक्यता ८० टक्के असते, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.