एकतर्फी प्रेमातून ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिल्याने तरुणीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून तिचे पहिले लग्न त्याने मोडले. त्यानंतर आता दुसरे ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी महेंद्र अशोक ससाणे (रा. कोळीये, ता. खेड) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रघुनाथ सयाजी कदम (वय ५७, रा. कोळीये, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, महेंद्र ससाणे आणि कदम हे एकच गावात राहतात. महेंद्र याने कदम यांची मुलगी नयना (वय २३) हिला गेल्या एक वर्षापासून तू मला आवडतेस. माझ्या सोबत लग्न कर असे म्हणत होता. मात्र, त्यांच्या मुलीचा त्याला विरोध होता. तो तिला वारंवार भेटून तसेच तिच्या मोबाईलवर कॉल करुन व मेसेज करुन तिला त्रास देत होता. तू माझ्याबरोबर लग्न केले नाही तर तुझी मी सर्वांकडे बदनामी करेल, अशी धमकी देत होता.

सुमारे एक वर्षापूर्वी आईवडिलांनी तिचे लग्न ठरविले होते. ते त्याने अशीच धमकी देऊन व तिच्या भावी वराला व त्यांच्या घरच्यांना चुकीची माहिती देऊन तिची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी हे लग्न मोडले होते. आता तिचे दुसरे लग्न ठरले होते. ते त्याला समजल्यावर त्याने तिला परत एकदा तिचे लग्न मोडण्याची धमकी दिली. त्यामुळे नयना हिला जगणे नकोसे केले. या त्रासाला कंटाळून नयना हिने ३ एप्रिल रोजी सकाळी ती घरात एकटी असताना आत्महत्या केली. चाकण पोलिसांनी महेंद्र ससाणे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like