Pune News : कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मैत्रिणीसोबत कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे गावात आज (सोमवार) सकाळी दहाच्या सुमारास अभिनव कॉलेज रोडजवळ झाला. साक्षी आप्पा बाटे (वय-19 रा. बी. समर्थनगर, गणेशनगर, धायरी) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साक्षी आणि तिची मैत्रिण रागिणी बालाजी कंकुले या दोघी दुचाकीवरून नऱ्हे येथील नर्सिंग कॉलेजला जात होत्या. त्यावेळी रागिणी कंकुले ही दुचाकी चालवत होती. अभिनव कॉलेज रस्त्याने जात असताना पाण्याचा टँकर (एमएच 12 एचडी 4091) हा दुचाकीच्या पुढे चालला होता. टँकर चालकाने अचानक टँकर थांबवला.

टँकर चालकाने टँकर थाबवल्याने या दोघींच्या दुचाकीला ब्रेक लागला. यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेली साक्षी ही पाण्याच्या टँकरच्या मागे पडली. त्याचवेळी टँकर पाठीमागे आला. टँकरचे चाक साक्षीच्या पोटावरून गेले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या साक्षीचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.