Jalgaon News : धक्कादायक ! पोलिसांनीच वसतिगृहातील मुलींना कपडे काढून लावले नाचायला

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन – येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील एक धक्कादायक प्रकार सामाजिक संघटनांनी उघडकीस आणला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि इतर बाहेरच्या व्यक्तींनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचे समोर आले आहे. दरम्यान यासंदर्भात सामाजिक संघटनांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली. त्याच बरोबर या घटनेचा व्हिडिओही सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून तत्काळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

गणेश कॉलनीतील महिला व बालकल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. यासंदर्भात जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृह गाठून महिला व मुलींची भेट घेतली. त्यावेळी १ मार्च रोजी काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने चौकशीच्या नावाखाली बाहेरील लोकांना व पोलिसांना आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. चौकशीसाठी आलेल्यांची मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते.

या वसतिगृहात ज्यावेळी सामाजीक कार्यकर्ते गेले त्यावेळी त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही. मात्र मुलींनी आपल्यावर बेतलेला प्रसंग खिडकीतूनच सांगितला. यावेळी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलणाऱ्या मुलींना मज्जाव करण्यात आला