Pune News : ‘थर्टी फस्ट’च्या रात्री तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनीच केला विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत (Happy New Year) सर्वत्र उत्साहात करण्यात आले. यंदाच्या थर्टी फस्टवर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांनी घरात राहूनच नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन केले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पुणेकरांकडून सर्व नियमांचे पालन करत आपल्या आनंदाला वाट करुन दिली. मात्र, 31 डिसेंबरच्या रात्री हडपसरमध्ये घडलेल्या एका प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

थर्टी फस्टच्या रात्री गप्पा मारण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मैत्रिणीच्या वडिलांनीच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरात घडली असून तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 49 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

याप्रकरणी 19 वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी या मांजरीतील कमल पार्क सोसायटीत राहणाऱ्या मैत्रिणीकडे 31 डिसेंबरच्या रात्री गप्पा मारण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मैत्रिणीच्या वडिलांनी फिर्यादीचा हात पकडून तिला जवळ ओढून जबरदस्तीने ओठाचा किस घेऊन विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.