प्रियकराच्या पत्नीला प्रेयसी म्हणाली – ‘सगळी प्रॉपर्टी घे, तुझा नवरा मला दे’

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – ५७ वर्षांची एक सरकारी महिला अधिकारी आपल्या ज्युनियर ४५ वर्षांच्या सहकाऱ्याच्या इतक्या प्रेमात पडली की एके दिवशी ती त्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या पत्नीला म्हणाली की, माझी सर्व प्रॉपर्टी घे आणि तुझा नवरा मला दे. ही आश्चर्याची बाब मध्य प्रदेशची राजधानी भोपाळची आहे.

हे प्रकरण भोपाळच्या फॅमिली कोर्टात १७ एप्रिलनंतर सल्लामसलत करण्यासाठी आले. सरिता राजानी यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

राजानी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशच्या सरकारी विभागात एका महत्त्वाच्या पोस्टवर तैनात असलेल्या महिला सरकारी अधिकाऱ्याच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मुलगा व सूनही तिच्यासोबत वाईट वागू लागले. अशात त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या ४५ वर्षांच्या सहकाऱ्याशी त्यांची जवळीक वाढू लागली.

कोरोना विषाणूमुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये २५ मार्चपासून त्या एकट्या राहत असताना त्यांना त्यांच्या प्रियकराची कमी जाणवायला लागल्यावर त्या १७ एप्रिलला प्रियकराच्या घरी पोहोचल्या. स्वयंपाकघरात काम करणार्‍या प्रियकराची पत्नी बाहेर आली तेव्हा तिला आश्चर्य वाटले.

महिला सरकारी अधिकारीने आपली सर्व मालमत्ता घेऊन प्रियकराच्या पत्नीला आपला तिचा नवरा देण्यास सांगितले. हे ऐकताच घरात गोंधळ उडाला आणि त्यानंतर त्या महिलेचा मुलगा व सूनही तिथे पोहोचले. त्यानंतर हे प्रकरण कौन्सिलिंगसाठी फॅमिली कोर्टात गेले.

हे प्रकरण आणखीनच बिकट झाले जेव्हा नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितले की तो त्या बाईला एकटे सोडू शकत नाही. यावर बायकोचे म्हणणे आहे की १४ वर्षानंतर पतीने तिची फसवणूक केली आहे, ती त्याला कधीही माफ करू शकत नाही. यानंतर दोन्ही बाजूंना सातत्याने समजावले जात आहे.