धक्कादायक…… प्रियकराला मारहाण करून प्रेयसीवर केला सामूहिक बलात्कार

गोवाः वृत्तसंस्था

बेतालभाटी येथील सनसेट बीचवर फिरायला आलेल्या प्रियकराला जबर मारहाण करुन प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सासष्टी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोलवा पोलीस रात्री उशिरापर्यंत त्या तीन नराधमांचा शोध घेत होते. गुरूवारी रात्री 9.30 च्या दरम्यान सदरची घटना घडली असून, पीडीत युवती ही 20 वर्षीय असून तिचा मित्र 22 वर्षांचा आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रात्री 8 च्या दरम्यान एक प्रेमी युगुल बेतालभाटी समुद्र किनार्‍यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्या ठिकाणी अन्य काही जोडपीसुद्धा होती. रात्री त्या ठिकाणची सर्व जोडपी माघारी परतली होती. परंतू हे जोडपे त्या ठिकाणी रात्री साडेनऊपर्यंत थांबले होते. यावेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात तीन इसम त्या ठिकाणी आले. किनाऱ्यावर अन्य कोणी नसल्याचे पाहून त्यांनी त्या युगलाला पकडले आणि त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. आपल्याकडे पैसे नसून जवळच पार्क केलेल्या दुचाकीच्या डिकीमध्ये दोनशे रुपये ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पैसे घेण्यासाठी ते तीन नराधम दुचाकीजवळ आले. पैसे घेवून देखील समाधान झाले नसल्यामुळे त्यांनी युवतीकडे शरीरसुखाची मागणी केली. पण तिने या प्रकाराला नकार देताच तिच्या मित्राला या तिघांनी जबर मारहाण केली आणि पीडीतेवर आळीपाळीने बलात्कार केला. अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली आहे.

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तिघा अज्ञात युवकांविरोधात कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नवलेश देसाई करीत आहेत.