झारखंड : कौतुकास्पद ! शिक्षकाच्या रूपात पोलिस कर्मचारी, मुलींच्या शाळेत सोडवताहेत गणितं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आतापर्यंत तुम्ही एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला सामान्यत: गुन्हेगारांना पकडताना किंवा एखादे प्रकरण सोडवतानाच पाहिले असेल. पण झारखंडच्या धनबादमध्ये एक असे पोलीस कर्मचारी आहेत जे आपल्या ड्युटीतून वेळ काढून मुलींना शिकवतात.

लॉकडाऊन नंतर जेव्हा धनबादमध्येही इतर सर्व ठिकाणांप्रमाणे शाळा उघडल्या, तेव्हा लोकांना एक बदल दिसला, ज्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. बदल असा होता की मुलींच्या शाळेत (गर्ल्स स्कूल) एक पोलीस कर्मचारी मुलींना शिक्षक म्हणून शिकवत होते. धनबाद येथील मोदीडीह बालिका उच्च विद्यालयात परिसरातील पोलीस कर्मचारी पंकज वर्मा नियमितपणे पोलिसांच्या गणवेशात जाऊन एका शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांना गणित शिकवतात आणि त्यांना फॉर्म्युला समजावून सांगतात.

स्टेशन प्रभारीच्या अध्यापनाच्या शैलीने विद्यार्थिनीही खूप खूष आहेत आणि त्यांना सहजपणे गणित समजत आहे. पंकज वर्मा यांच्या या प्रयत्नामुळे विद्यार्थिनींमधील पोलिसांची भीती संपुष्टात आली आहे आणि निर्भयतेने त्या आपल्या समस्या सांगतात. शाळेचे प्राचार्य सतीश सिंह म्हणाले की, स्टेशन प्रभारी पंकज वर्मा यांनी त्यांच्याकडे संपर्क साधला होता आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना गणिताची शिकवण देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी आपली संमती दिली होती. संमती मिळाल्यानंतर ते शाळेत पोहोचले आणि मुलींना शिकवू लागले.

स्टेशन प्रभारी पंकज वर्मा यांनी सांगितले की ते मूळचे कोडरमा जिल्ह्यातील मरकच्चो गावाचे रहिवासी असून त्यांनी बालपणापासूनच अभ्यासाला खूप महत्त्व दिले आहे. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची त्यांची इच्छा होती. ते पोलिसात येण्यापूर्वी आपले कोचिंग देखील चालवत असत. चर्चेदरम्यान स्टेशन प्रभारी पंकज वर्मा म्हणाले की, प्रत्येक घरात शिक्षणाची भावना निर्माण करायची आहे जेणेकरुन कोणीही अशिक्षित व्यक्ती राहू नये. म्हणून त्यांच्या वतीने जे काही करता येईल ते काम ते मनापासून करत आहेत.