‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेसाठी मुली जिवंत राहणे गरजेचे : शबाना आझमी

कठुआ आणि उन्नाव या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनेचा देशभरातून संताप व्यक्त होता आहे. बॉलिवूडकरांनी देखील आपल्या पद्धतीने निषेध नोंदवला. या प्रकरणावर आता ज्येष्ठ अभिनेत्री संसद सदस्य शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया दिली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मोहिमेचा संदर्भ देत शबाना आझमी यांनी याप्रकरणांवर भाष्य केले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहीम चांगली आहे, मात्र या मोहिमेसाठी मुली जिवंत तर राहिल्या हव्यात,”असे शबाना आझमी यांनी पुरस्कार सोहळ्यात म्हटले आहे.

या पुरस्कार सोहळ्यात जितेंद्र, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, अनुप जलोटा आणि अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती.

”आपल्या देशात एकाच वेळी १८ व्या, १९ व्या शतकात अजूनही जगणारी माणसे आहेत. स्त्रियांना त्या काळात दिली जाणारी वागणूक अजूनही कायम आहे. स्त्रियांचा अनादर न करणारी माणसे समाजात अजून आहे. एकीकडे स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कामगिरी करत आहे, तर दुसरीकडे चिमुरड्या मुलीही असुरक्षित हा विकृत मानसिकतेचा कळस आहे,” असे शबाना आझमी यांनी म्हटले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या घोषणा कायम केल्या जातात. मात्र आपल्या मुली जिवंत कशा राहतील हे पाहणे आपली जबाबदारी आहे असे मत शबाना आझमी यांनी मांडले.