डीएसके प्रकरण : फॉरेंसिक रिपोर्ट सादर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी द्यावा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-हजारो गुंतवणुकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यातील फॉरेंसिक रिपोर्ट सादर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज पोलिसांनी न्यायालयाला दिला आहे.

पोलीसांकडून आॅक्टोंबर २०१८ मध्ये याप्रकरणाचा फॉरेंसिक रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात येणार होता. मात्र, अद्याप तो सादर झालेला नाही. हा रिपोर्ट येण्यासाठी दोन महिने पुरे आहेत. त्यामुळे रिपोर्टबाबत सरकरी पक्ष चालढकल करीत आहे. डीएसके यांनी ६ कोटी ६५ लाख रुपये जमा केले आहे. त्याचे वाटप कसे करायचे याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाले नाही. तसेच डीएसके यांनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला त्यावेळ २२ गुंतवणुकदारांना त्यांच्या रक्कमेचे चेक देण्यात आले होते. ते देखील अद्याप तसेच आहेत, अशी माहिती बचाव पक्षांचे वकील अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी मागील सुनावणी वेळी न्यायालयास दिली होती. त्यामुळे रिपोर्ट सादर करण्यासाठी पोलिसांनी एका महिन्यांची मुदत मागितली आहे.

डीएसके यांची सून तन्वी यांनी अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तिचा पती शिरीष कुलकर्णी याला याप्रकरणात यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. डीएसके यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी  बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना वगळण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टवर आपले लेखी म्हणणे (से) सादर करावे, असे आदेश मुळ फिर्यादी यांना विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी दिला आहे. फिर्यादी यांच्या सेची प्रत सरकारी वकिलांना प्राप्त झाल्यानंतर त्यावर १५ नोव्हेंबरला युक्तिवाद होणार आहे.