विधानपरिषदेवर खेळाडू कोट्यातून काका पवार यांना संधी द्या, पैलवान मंडळींची शरद पवारांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुस्तीसारख्या खेळाच्या अनेक अडचणी शासन दरबारी मांडल्या जाव्यात, यासाठी राज्यपाल नियुक्त खेळाडू कोट्यातून अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान काका पवार यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी कुस्तीक्षेत्रातील तमाम पैलवान मंडळींनी केलीय. या पार्श्वभूमीवर रोहा (जि.रायगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काका पवारांनी भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या समवेत महाराष्ट्र केसरी पै. दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी पै. दिलीप भरणे, आशियाई सुवर्णपदक विजेते पै. रवींद्र पाटील उपस्थित होते.

राज्यपाल कोट्यातून खेळाडू व्यक्ती म्हणून काकांची आमदारपदी नियुक्त व्हावी. काकांना विधानपरिषदेवर संधी दिल्यास कुस्तीसारख्या खेळाच्या अनेक अडचणी शासन दरबारी मांडल्या जातील. ज्यामुळे अनेक सुविधांपासून वंचित असणार्‍या खेळाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा पैलवान मंडळींनी व्यक्त केलीय. महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात काका पवार हे नाव चर्चेत आहे. ज्या महाराष्ट्र राज्यात शे – दीडशे किलो वजन आणि सहा-सव्वासहा फूट उंच असणार्‍या व्यक्तीला पैलवान म्हंटले जात होते. त्याच महाराष्ट्रात 50 – 55 वजनाचा व्यक्ती देखील पैलवान होऊ शकतो. अन् तो व्यक्तीही देशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकवू शकतो, असा इतिहास काका पवार यांनी रचलाय. गोकुळ वस्ताद तालमीमध्ये हरिश्चंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली काका पवार एशियाड कुस्ती स्पर्धा खेळली.

राष्ट्रकुल सारख्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. ग्रीक रोमन कुस्ती प्रकारामध्ये देशाला 32 पदके मिळवून दिलीत. काकांच्या यशस्वी खेळाबद्दल केंद्र सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय.कुस्ती निवृत्तीनंतर कात्रजमधील जांभुळवाडी इथे ’आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल’ नावाने तालीम सुरू केलीय. आजही राज्यातील अनेक मल्लांना काका कुस्तीचे धडे देत आहेत. राहुल आवारे, विक्रम कुर्‍हाडे यांसारखे जागतिक दर्जाचे मल्ल त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेेत. काकांकडून कुस्तीचे धडे गिरवलेल्या पंधरा पैलवानांना ’शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ मिळालाय. तर, राहुल आवारे यांसारखा पैलवान पोलीस उपअधीक्षक अशा क्लास वन पदावर नोकरी करतोय. तसेच काकांच्या तालमीतील किमान 50 ते 60 पैलवान केंद्र सरकारच्या रेल्वे खात्यात नोकरी करताहेत. मैदानी कुस्तीमध्ये किरण भगत सारखा मल्ल त्यांनी घडवलाय. चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी नाशिकचा हर्षल सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके हे दोन्ही मल्ल काकांच्याच तालमीत तयार झालेत.