‘हा’ मतदार संघ भाजपाला द्या ; अन्यथा काम करणार नाहीत : भाजप नगरसेवकांचा इशारा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभेची जागा मिरीटीनुसार भाजपाला द्यावी अशी मागणी ठाण्यातील भाजपाच्या २३ नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. याचबरोबर जर ही जागा भाजपाला सोडली नाही, तर निवडणुकीचे कामही करणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सर्व मतभेद दूर सारून शिवसेना – भाजपने युतीची घोषणा केली. मात्र ठाणे लोकसभेची जागा मिरीटीनुसार भाजपाला द्यावी अशी मागणी ठाण्यातील भाजपाच्या २३ नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. लोकसभा मतदार संघात भाजपाचे विधानसभेत नंदा म्हात्रे, नरेंद्र मेहता, संजय केळकर तर निरंजन डावखरे आणि रमेश पाटील हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. परंतु शिवसेनेचे मात्र विधानसभेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आणि रविंद्र फाटक हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे या संख्याबळाचा विचार केल्यास मिरीटनुसार भाजपाच आघाडीवर आहे. त्यामुळे ही जागा भाजपाला सोडावी अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.

इतकेच नव्हे तर, जर ही जागा भाजपाला सोडली नाही, तर निवडणुकीचे कामही करणार नाही असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी भाजपाचे आमदार आणि नगरसेवकांच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम केले आहे. तसेच लोकांशी उध्दटपणे वागणे यामुळे ठाणेकरसुध्दा त्यांच्यावर नाराज आहेत. या संदर्भात आपल्याकडे वारंवार तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

याचबरोबर ही जागा शिवसेनेला देणे अपरिहार्य झाले तरी सुध्दा राजन विचारे यांच्या ऐवजी दुसरे कोणतेही नाव द्यावे त्यांच्यासाठी आम्ही काम करु मात्र विचारेंचे काम करणार माही असा इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, सर्व नगरसेवकांची जी मागणी आहे, त्यानुसार हा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे श्रेष्ठी याची दखल घेतील अशी अपेक्षा आहे. असे तेथील भाजपा गटनेते नारायण पवार यांनी म्हंटले आहे.