मातृभाषेबरोबर इंग्रजीला महत्त्व द्या : अशोक बालगुडे

पुणे – मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी विषय शिकविला जात आहे. इंग्रजी भाषा आली पाहिजे, याबाबत दुमत असायचे काही कारण नाही. मात्र, मातृभाषेत शिकणारी मुले इंग्रजीचे अवलोकन चांगल्या पद्धतीने करीत आहेत. तरीसुद्धा इंग्रजी माद्यमांच्या शाळांचे आकर्षण म्हणून अलीकडे पालकवर्गाची चलबिचल होत आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळेतील मुलांचा स्पर्धा परीक्षा आणि आयएएस, आयपीएस, शासकीय अधिकाऱ्यांमध्ये वरचा क्रमांक आहे, ही बाब आपण अधिकाऱ्यामधील श्रेयनामावली पाहिली तर लक्षात येईल, असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे यांनी व्यक्त केले.

बालगुडेपट्टा (सावळ, ता. बारामती, जि. पुणे) येथे बालगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सावळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य फक्कड तुकाराम बालगुडे, रोहिणी रमेश खोमणे, माजी सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामस्थ सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार बालगुडे म्हणाले की, स्वतःला मोठे व्हायचे असेल तर, इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणारी मंडळी अल्पावधीसाठी प्रगती करतात. मात्र, जी मंडळी सगळ्यांचा विचार करतात, त्यांची प्रगती चिरकाल टिकून राहते, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढउतार असतात. सर्वसामान्यांना आशा आणि इच्छा असतात. मात्र, यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात, त्यासाठी आपण योग्य दिशा निवडून पुढे चालायचे आहे, असा सल्ला त्यांनी दिला.

दरम्यान, मुख्याध्यापक रवींद्र राणे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या मागिल दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालगुडेपट्टा (सावळ, ता. बारामती) येथे आल्यापासून शाळेतील मुलांची पटसंख्या वाढली आहे. पाचवीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत विद्यार्थी चमकतील. त्या दृष्टीने आम्ही मुलांची तयारी करून घेत आहोत. शाळेतील विद्यार्थी अस्खलित इंग्रजी आणि मराठी उच्चार करत असून, अभ्यासामध्ये चांगली प्रगती करत आहे, या शाळेतील विद्यार्थी अधिकारी बनल्यानंतर अभिमानाने सांगणार मी या शाळेत शिकलो, हाच आमच्यासाठी मोठा पुरस्कार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षिका जयश्री पाटील यांनी आभार मानले.