गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्व द्यावे : हर्षवर्धन पाटील

श्री. नारायणदास रामदास सेवक पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी २५ हजाराचा निधी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – शालेय जिवणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्त्वपूर्ण स्थान असून आपल्या सर्वांच्या योगदानाने हे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण सक्रिय सहभागी होऊन ही पिढी घडवण्याची जबाबदारी पार पाडावी. कामाच्या निष्ठेने गुणवत्तेने हे कार्य केल्यास आपल्याला सर्व क्षेत्रात यशस्वी होता येईल. त्यामुळे सर्वांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाला अधिक महत्व देवुन भविष्यात येणारी युवापीढी चांगल्या प्रकारे घडविण्याचे काम शिक्षक वर्गाने करावे असे मत राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची श्री. नारायणदास रामदास सेवक सहकारी पतसंस्था आणि महाविद्यालयीन सेवकांची सहकारी पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहामध्ये आयोजित केलेल्या कर्मयोगी परिवार स्नेह मेळावा प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

यावेळी पतसंस्थेच्या वतीने पतसंस्थेचे चेअरमन प्रा. उत्तम माने, आण्णासाहेब खटके, प्रा. मनोहर बेद्रे, सुनील माळी, हनुमंत जगताप तसेच पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री दुष्काळ सहाय्यता निधीसाठी २५ हजार रुपयांचा चेक सुपूर्त करण्यात आला.

बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून विक्रमी मतांनी विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, लंडन येथे बिझनेस मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त केल्याबद्दल राजवर्धन पाटील तसेच संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांना सकाळ एक्सलेन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आल्याबद्दल पतसंस्थेच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. नीट या परीक्षेत यशस्वी होऊन एम. बी. बी. एस. ला प्रवेश मिळवलेला प्रशालेचा विद्यार्थी सागर नायकुडे याचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, संस्थेचे संचालक रमेश जाधव, विलासबापू वाघमोडे, गणपत भोंग, तुकाराम जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी, तर सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.