मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शिवसेनेच्या वायकरांचे PM मोदींना पत्र

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे विनंती केली आहे. यात मराठी भाषा ही राज्यातील प्रत्येक माणसाचा जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्राद्वारे विनंती करण्यात आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

रवींद्र वायकर यांनी या पत्रात, दिवंगत कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यातील सर्व शालेय संस्था, विद्यापीठे व अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये २७ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य, वस्तु आदींचा पुरावाही भारतीय पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही मराठी साम्राज्याची पायाभरणी केली तर पेशव्यांनी त्याचा विस्तार केला. १९४७ नंतर स्वतंत्र भारताने महाराष्ट्र राज्यात अधिकृत भाषेचा दर्जा दिला.

यापुर्वी तमीळ, संस्कृत, मल्ल्याळम, तेलुगू, कन्नड भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी राज्यसरकारने केंद्रसरकारकडे वारंवार पाठपुरावाही केला आहे. यासाठी नियुक्त कऱण्यात आलेल्या रामनाथ पठारे समितीने सर्व अहवाल पुराव्यांसह केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात सादर केले आहेत. उडिसी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याचे प्रकरण मद्रास न्यायालयात न्यायप्रविष्ठ होते. त्यामुळे मराठी भाषेसाठी अडचणी येत होत्या. आता हे प्रकरण निकाली लागले आहे. त्यामुळे मराठी भाषेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आठवण वायकरांनी पत्राद्वारे करुन दिली आहे. शिवाय केंद्रिय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती पत्राद्वारे वायकरांनी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like