‘पगार द्या किंवा चीन सीमेवर पोस्टिंगला पाठवा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशात सर्वात मोठ्या असणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गेल्या चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले आहे. याबाबत एका चालकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. या पत्रात आश्चर्याची गोष्ट अशी की, पगार देण्याची मागणी करण्यासोबतच पगार देत नसाल तर मला भारत चीन सीमेवर जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ‘भारत चीन सीमेवर मी देशासाठी लढत सन्मानाने प्राण देईल ” असं या चालकाने पत्रात म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलं आहे.

आनंद हेलगावकर असं त्या चालकाचं नाव असून ते नालासोपारा परिसरात राहतात. आनंद हे १९९९ पासून मुंबई सेंट्रल आगारामध्ये एसटीचे चालक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना सातत्याने प्रकृतीबाबत अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. तसेच आनंद यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या आईला देखील प्रकृतीबाबत तक्रारी आहेत. त्यात पगार वेळेत होत नसल्याने संपूर्ण कुटूंबाचे हाल होत असल्याचं आनंद म्हणाले. दरम्यान, हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर आनंद यांनी आपला फोन बंद केला असून या प्रकरणी एमएसआरटीसीने चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र राज्य वाहतूक कामगार संघटनेचे संदीप शिंदे म्हणाले, ‘राज्यात लॉकडाऊन मुळे एसटी बंद असल्याने एमएसआरटीसीला दिवसाला २३ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा खूप मोठा फरक आहे. एसटीला उत्पन्नच मिळत नसल्याने पगार देण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुंबई आणि उपनगरातील कर्मचारी वगळता राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीने मार्च महिन्याचा ७५ टक्के पगार एप्रिलमध्ये देण्यात आला. एप्रिलचा १०० टक्के पगार मे महिन्यात देण्यात आला तर मे महिन्याचा ५० टक्के पगार जूनमध्ये देण्यात आला. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना थकीत पगार आणि जूनचा पूर्ण पगार देण्याची गरज आहे. आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहल आहे. एसटी महामंडळाला आणि कर्मचाऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी दोन हजार कोटींची हमी द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे,’ असं शिंदे यांनी सांगितलं.

तर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्व निर्णय परिवहन मंत्री घेतात असं म्हटलं आहे. तसेच जून मध्ये सुद्धा केवळ ५० टक्केच वेतन देण्यात येणार असल्याचे संकेत आम्हाला देण्यात आल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.