विठ्ठल भक्तांनी ‘ऑनलाईन’ देणग्या द्याव्यात, मंदिर समितीचे आवाहन

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या इतिहासात प्रथमच प्रशासनाने आषाढी पालखी सोहळा व पंढरपूरची यात्रा रद्द केली आहे. येत्या १ जुलै रोजीची आषाढी एकादशी वारकरी आणि हरिनामाच्या जयघोषा विना साजरी होत आहे. त्यामुळे यंदा विठूरायाची पंढरी सुनीसुनी वाटत आहे. त्यातच साक्षात विठुरायाच्या दक्षिणा पेटीतही यंदा खडखडाट पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आल्याने मंदिर समितीचे सुमारे १७ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. म्हणून यंदा आषाढीसाठी येऊ न शकलेल्या भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने मंदिर समितीला देणग्या दिल्या जाव्यात, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी केले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मागील ३ महिन्यांपासून बंद असल्याने भाविकांकडून देवस्थानला येणारे देणगी उत्पन्न पूर्ण बंद झालं आहे. तसेच लॉकडाऊन काळात चंदन उटी पूजा आणि भाविकांच्या नित्य पूजा रद्द कराव्या लागल्या आहेत. चंदन उटी पूजा दिवसातून ३ वेळा केली जाते. त्या दैनंदिन खर्च ७५ हजार रुपये येतो. तो मागील ९० दिवसांपासून बुडाला असून, नोंदणी केलेल्या ४० उटी पूजांचे पैसे भाविकांना परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मंदिर समितीला चंदन उटीद्वारे मिळणारे सुमारे पावणे सात कोटी रुपये, नित्यपूजेतून मिळणारे सुमारे ३ कोटी रुपये यंदा बुडाले आहेत. तसेच चैत्री यात्रा रद्द केल्यामुळे देखील मिळणारे २ कोटी रुपये, दान पेटी, देणगी पेटी, देणगी पावती, फोटो विक्री, प्रसाद विक्री च्या माध्यमातून मंदिर समितीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. मार्च आणि मे महिन्यात भाविक न आल्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत मिळणारे सुमारे १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले नाही.

राज्यात आलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती मंदिर समितीने राज्य सरकारला १ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच शहरातील गरीब नागरिकांना लॉकडाऊनच्या कालावधीत ३ महिन्यात दररोज ३ हजार अन्नाचे पॅकेट्स, पीपीई कीट वाटप, भटक्या जनावरांना वाटप यातून मंदिर समितीने सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च केला आहे. यंदा आषाढी यात्रा रद्द केल्यामुळे आणखी ५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. तरी गेल्या काही महिन्यांमध्ये मंदिर समितीला वेगवेगळ्या स्वरुपात १७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आषाढी वारीला येऊ न शकणाऱ्या भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ऑनलाइन पद्धतीने देणगी देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यवस्थापन मंडळाकडून करण्यात आली आहे.