‘तुकडे-तुकडे’ गँग संपवायची आहे ना ? तर लष्कर प्रमुखांना आदेश द्या : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे जेएनयूमधील डाव्या विद्यार्थी संघटनांचा उल्लेख नेहमी तुकडे-तुकडे गँग असा करतात. तसेच कालच गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीवरून तुकडे-तुकडे गँगवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. यावरूनच शिवसेनेने मोदी सरकारला आपल्या मुखपत्रातून सल्ला दिला आहे. देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणार्‍यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा तुकडे-तुकडे गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ काढा, त्यालाच आम्ही देशभक्ती म्हणतो. संसदेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. तुकडे तुकडे गँगला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

सामानाच्या अग्रलेखात म्हटले आहे की,  यांनी त्याच दिशेने पाऊल टाकण्यासाठी केंद्राकडे आदेश मागितले आहेत. हिंदुस्थानचे लष्कर हे संविधानात्मक मूल्यांचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आमचे लष्कर कटिबद्ध आहे. नैतिकता, नियम व संकेत पाळणे हे आमच्या लष्कराचे कर्तव्यच आहे. पाकिस्तानी लष्कराप्रमाणे घुसखोरी करणे हा आमच्या लष्कराचा पुरुषार्थ नाही. देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. तुकडे तुकडे गँगला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, नवे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटले की, पाकव्याप्त काश्मीर आमचेच आहे. केंद्र सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ. जनरल नरवणे यांच्या वक्तव्याचे पडसाद पाकिस्तानात उमटू शकतात, पण असे पडसाद उमटले तरी पाकिस्तान काय करणार ? कारण पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यानुसार पाकचे डोके ठेचले गेले आहे. जनरल नरवणे यांनी चुकीचे काहीच सांगितले नाही. पाकव्याप्त कश्मीरमध्येच सर्वाधिक दहशतवादी तळ व प्रशिक्षण केंद्रे आहेत आणि पाकिस्तानचे लष्कर, आयएसआयच्या पाठिंब्याने हे तळ चालवत आहे.

मधल्या काळात आपल्याकडून जे काही सर्जिकल स्ट्राइक वगैरे झाले ते याच भागात, पण सर्जिकल स्ट्राइक होऊनही पाकड्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच. त्यांच्या कुरापती काही थांबलेल्या नाहीत. काश्मीर खोर्‍यात आजही आमच्या सैनिकांचे रक्त सांडले जात आहे. रोज बलिदाने होत आहेत, पण काश्मीरचा प्रश्न हा राजकीय किंवा निवडणुकांपुरताच उसळून वर येतो व त्यावर राजकीय भाकर्‍या शेकल्या जातात. हे आता नित्याचेच झालेय. अग्रेलखात पुढे म्हटले आहे की, जनरल नरवणे यांच्या नव्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. जनरल नरवणे म्हणतात, हिंदुस्थानच्या संसदेनेच फेब्रुवारी 1994 व त्याआधीही असा ठराव केला आहे की, पाकव्याप्त कश्मीरसह संपूर्ण जम्मू-काश्मीर हे हिंदुस्थानचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरवरील बेकायदेशीर ताबा सोडून द्यावा. संसदेचाच असा ठराव असल्याने केंद्राने आदेश द्यावेत. लष्कर घुसवून पाकड्यांचे कंबरडे मोडून काढू व संपूर्ण काश्मीरचा ताबा घेऊ असे त्यांचे म्हणणे आहे. जनरल नरवणे हे केंद्राकडे लष्करी कारवाईचा आदेश मागत आहेत व पंतप्रधान मोदी यांनी असे आदेश द्यावेत अशी देशभावना आहे.

सर्जिकल स्ट्राईकचा बार उडवल्यावर प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान मोदी व भाजपचे सगळेच नेते बुलंद आवाजात सांगत होते, देशवासीयांनो, आता पुढचे लक्ष्य पाकव्याप्त काश्मीर आहे बरं का ! पाकने घशात घातलेले काश्मीर सोडवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करू ! जनरल नरवणे सरकारच्या त्याच भूमिकेची री ओढत आहेत. अमित शहा यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवून क्रांती केली. आता जनरल मनोज नरवणे यांना मोदी-शहा यांचे आदेश मिळताच पाकव्याप्त काश्मीर आपले होईल व अखंड हिंदुस्थानची पुष्पमाला वीर सावरकरांना चढवली जाईल. अखंड हिंदुस्थान हे तर वीर सावरकरांचे मोठे स्वप्नच होते. त्यामुळे सावरकरांचादेखील सन्मान होईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/