विकासाची दृष्टी असलेल्या तरुण नेतृत्वाच्या हातात सत्ता द्या : शरद पवार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे सरकार हे शेतकरी, कामगार, महिला अशा सर्वच समाजघटकांवर अन्याय करीत आहे. हे सरकार घालविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. मला जनतेने आतापर्यंत सर्व काही दिले आहे. आपल्याला आता काहीही नको आहे. आपल्याला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचाय. त्यामुळे विकासाची दृष्टी असलेल्या तरुण नेतृत्वाच्या हातात सत्ता द्या अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तळेगाव येथील जाहीर सभेत केली.

मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस-एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार सुनील शेळके, माजी मंत्री मदन बाफना, माजी खासदार नानासाहेब नवले माजी आमदार कृष्णराव भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार जयदेव गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, पै चंद्रकांत सातकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, एसआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे , एसआरपीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव शिंदे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड कृष्णा दाभोळे, लोणावळा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जीवन गायकवाड, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाषराव जाधव, तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, सुरेश चौधरी, यादवेंद्र खळदे, चंद्रभान खळदे,सरपंच दत्तात्रय पडवळ, जिल्हा युवक उपाध्यक्ष संतोष मु-हे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, तसेच रुपालीताई दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, मावळात निवडणुकीचा निकाल काय लागणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आपण राज्यात अनेक प्रचंड सभा पाहिल्या आहेत, पण तळेगावात आज गर्दी पाहतोय, त्यावर आपला विश्वासच बसत नाहीत. ‘मंत्री महोदय, यहाँ कुछ बदलाव आ रहा है’, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भाजप सरकारवर पवार यांनी कडाडून टीका केली. १६ हजार शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्या. हे सरकार धनाढ्यांच्या कर्जाची थकबाकी भरण्यासाठी सरकारी तिजोरीतून ८१ हजार कोटी रुपये देते आणि शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांवर जप्ती आणते. शेतीमालाची किंमत वाढली की दिल्लीत दंगा होतो. त्यांना बाकी महागाई चालते. सत्ताधारी फक्त ग्राहकांचा विचार करतात. आम्ही नेहमी शेतकऱ्यांचा विचार करतो. आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. शेतकऱ्यांना न्याय देण्याची आमची नेहमीच भूमिका राहिली आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

राज्यात आम्ही उद्योग- धंदे वाढवले. औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. त्यातून तरुणांना रोजगार मिळावा हा हेतू होता. पण प्रत्यक्षात त्यात उत्तर प्रदेश आणि बिहारचे कामगारच काम करताना दिसत आहेत. आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी राज्यात सत्तापरिवर्तन होणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. महिलांना सन्मान दिला. या सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले. यूपीमध्ये मंत्री बलात्कार करतो, भाजप राजवटीत महिला असुरक्षित आहोत, असा आरोप पवार यांनी केला. कामगारांवर सर्वत्र अन्याय सुरू आहे. रोजगार वाढण्याऐवजी सर्वत्र कामगार कपात सुरू आहे. अशा लोकांच्या हातात सत्ता नको, असेही ते म्हणाले.

Visit : Policenama.com