वैद्यकीय कॉलेजचे रिकामे बेडस् ‘कोरोना’ग्रस्तांना द्या, खा. बापट यांची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रूग्णालयातील सर्व खाटा ( बेडस् ) कोरोनाग्रस्त रुग्णांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडे केली. कोरोनाग्रस्त रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी केंद्राने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची नियमावली शिथील करावी, अशी सूचनाही बापट यांनी केली.

पुण्यासह महाराष्ट्रातील कोविड 19 ची सद्यस्थिती, त्यातील अडचणी व उपाययोजना याची माहिती केंन्द्र सरकारला देण्यासाठी बापट दिल्लीत आले आहेत. त्यांनी या विषयाचे तपशीलवार टिपण डाॅ. हर्षवर्धन यांना सादर केले. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. बापट म्हणाले , जनरल वाॅर्ड व्यतिरिक्त वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विविध शाखांसाठी खाटा ( बेडस् ) राखून ठेवलेले असतात. गायनाकॉलॉजी, हृदय रोग, अस्थिरोग इत्यादी शाखांसाठी काही वॉर्ड राखून ठेवलेले असतात. त्यामध्ये तज्ञ डॉक्टर्स व अद्ययावत सुविधाही उपलब्ध असतात. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार अशा खाटा राखून ठेवणे बंधनकारक असते.

त्यामुळे सद्यस्थितीत या महाविद्यालयांना मान्यता टिकवून ठेवण्यासाठी व कौन्सिलच्या नियमांचे कठोरपणे पालन करण्यासाठी बेडस् रिकामे ठेवावे लागतात. तेथे सर्वसाधारण व अंतर्गत औषधोपचारांसाठी स्वतंत्र वॉर्डस् तयार केलेले असतात. सद्यस्थितीत ते रिकामे आहेत. ही बाब मी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पुण्यासह राज्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. तथापि त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात बेड्स उपलब्ध असूनही प्रवेश नाकारला जातो. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचीची मान्यता रद्द होईल. या भीतीने रुग्णालय प्रशासन कोरोनाग्रस्त रुग्णांना प्रवेश नाकारतात. असे ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाकडून मला समजले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांच्या नियमावलीनुसार हे कामकाज चालते असे जिल्हा प्रशासनाने माझ्या लक्षात आणून दिले आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास एखाद्या रुग्णालयाची क्षमता 650 बेडस् ची असेल तर त्यांना फक्त 150 कोरोना ग्रस्त रुग्ण दाखल करून घेता येतात. तसेच टीबी किंवा श्वसनाच्या विकाराने आजारी असलेल्या रुग्णांसाठी खाटा राखून ठेवाव्या लागतात. त्यामुळे सुमारे 480 खाटा रिकाम्या असतात. केंद्र सरकारने नियम शिथिल करून या रिकाम्या खाटा कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध करून द्याव्यात . त्यासाठी हंगामी स्वरूपाचा आदेश काढावा आणि अडचणीत आलेल्या रुग्णांना उपचार उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली. त्याला मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच आपण योग्य तो निर्णय घेऊ. असे आश्वासन त्यांनी दिल्याचे बापट यांनी सांगितले..