पंढरपूरनंतर आता नांदेडमध्ये आघाडीला धोका, काँग्रेसच्या जागेवर शिवसेनेच्या माजी आमदाराचा दावा, दिले ‘हे’ संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपने दारुण पराभव केला. पंढरपूरमध्ये पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच राज्यात आणखी एका पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात याठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ही जागा काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसकडून या जागेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. परंतु शिवसेनेच्या माजी आमदाराने या जागेवर दावा केला आहे. तसेच शिवसेनेने तिकीट दिले नाही तर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा इशारा दिला आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. भाजपच्या उमेदवाराने आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. याठिकाणी शिवसेनेच्या महिला नेत्याने बंडखोरी करत निवडणूक लढवली. आता पंढरपुरची पुनरावृत्ती देगलूरमध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेच्या माजी आमदाराकडून महाविकास आघाडीवर दबाव वाढवण्याची खेळी सुरु आहे.

दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. मात्र, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. सुभाष साबणे हे यापूर्वी दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मागिल निवडणुकीत अंतापूरकर यांनी त्यांचा पराभव केला होता.

दरम्यान, देगलूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस हे यापूर्वी वेगवेगळे लढले होते. पुढच्या काळात वेगळे लढतील. त्यामुळे ही पोटनिवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे. मी पक्ष प्रमुखांकडे उमेदवारी मागणार आहे. पालघर प्रमाणे शिवसेनेने ही जागा काँग्रेसकडून मागून घ्यावी. पंढरपूरची पुनरावृत्ती देगलूरमध्ये होऊ नये, असा इशारा सुभाष साबणे यांनी दिला आहे.