Maratha Reservation : मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा, म्हणाले – ‘OBC प्रमाणे सवलती द्या, अन्यथा 15 मे पासून तीव्र आंदोलन’

पोलीसनामा ऑनलाइनः मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयानंतर राज्यात सत्ताधारी अन् विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाने OBC प्रमाणे विविध सवलती द्याव्यात. अन्यथा 15 मे पासून राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पुणे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

आबासाहेब पाटील म्हणाले की, राज्य शासनाने मराठा आरक्षण रद्द झाल्याची जबाबदारी स्वीकारावी. यातून पळवाट काढून उपयोग होणार नाही. यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष व खदखद वाढेल त्यानंतर झालेला उद्रेक ठाकरे सरकारला रोखता येणार नाही. शासनाने मराठा उमेदवारांना लवकर सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. 2014 ते 2019 दरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांच्या तात्काळ नियुक्त्या कराव्यात. शैक्षणिक प्रवेशाकरिता ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. शासनातील काही अधिकारी निवड झालेल्या मराठा तरुणांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने ते न रोखल्यास मराठा समाजातील विद्यार्थी स्वस्थ बसणार नाहीत. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत शासनाने कोणतीही नोकर भरती प्रक्रिया राबवू नये. वैद्यकीय कारणासाठी गरज असल्यास तात्पूर्ती भरती करावी. राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.