उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘गिफ्ट’ देणं अधिकार्‍याला पडलं महागात, बसला ‘एवढ्या’ रूपयांचा ‘दंड’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करणे नियोजन विभागाच्या अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या भेटीची किंमत अधिकाऱ्याला दंडाच्या स्वरुपात चुकती करावी लागली. ही कारवाई अजित पवार यांनी केली नाही तर ही कारवाई पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी केली आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी पुस्तक मागवले होते. पुस्तकाला प्लास्टिकचे आवरण असल्याने पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दंडात्मक कारावाई केली. पुस्तक भेट घेऊन येणाऱ्या नियोजन विभागाच्या उपायुक्त रवी जगताप यांना याबद्दल 5 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. राज्यात प्लास्टिक बंदी असताना अधिकारीच कायद्याचं पालन करत नसल्याने आपल्या कारवाईची मालिका पांडेय यांनी यावेळीही कायम ठेवली. या कारवाईमुळे अधिकाऱ्यांनीच आधी प्लास्टिकचा वापर टाळावा, तरच सर्वसामान्य या कायद्याचं पालन करतील, अशी तंबी त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिली.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना मराठवाडा शिवसेना पदाधिकारी पुष्पगुच्छ घेऊन आले होते. मात्र, त्याला प्लास्टिक गुंडाळल्याचे निदर्शनास येताच पालिका आयुक्त पांडेय यांनी शिवसेनेचे लातूर उपजिल्हा प्रमुख आणि जालन्याचे तालुका प्रमुख या दोघांना दंड केला होता. आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.