उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटल्याने अलर्ट जारी

 नैनिताल : वृत्त संस्था – उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत -चीन सीमेजवळील नीती खोर्‍यात एक हिमनदी फुटली असून त्यामुळे उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी अलर्ट जारी केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात जोशी मठ येथे हिमनदी फुटल्याने धौली गंगा नदीला पूर आला होता. त्यात वीजप्रकल्पासह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच शेकडो जण बेपत्ता झाले आहेत. चमोली जिल्ह्यातील नीती खोर्‍यात हिमनदी फुटल्याची माहिती शुक्रवारी रात्री मिळाली़. गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने याची माहिती मुख्यमंत्री रावत यांना दिली.

जिल्हा प्रशासनाला या घटनेची संपूर्ण माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले असून उत्तराखंडातील सर्व नदीकाठांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील एनटीपीसी व इतर प्रकल्पांमधील काम थांबविण्यात आले आहे़.