भारत जगातील ‘चौथी’ सर्वात शक्तिशाली ‘सेना’, जाणून घ्या चीन आणि पाकिस्तानची रँक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   ग्लोबल फायर पॉवरने जगातील सर्वात बलवान सैन्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये 133 देशांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल फायरपॉवरच्या यादीमध्ये अमेरिकन सैन्याचे जगातील सर्वात ताकदवान सैन्य म्हणून वर्णन केले गेले आहे, तर रशियाला दुसर्‍या स्थानावर आणि चीनला तिसर्‍या स्थानावर स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर या यादीमध्ये शेजारी देश पाकिस्तानला दहाव्या स्थानावर स्थान देण्यात आले आहे.

ग्लोबल फायर पॉवर देशाच्या लष्करी सामर्थ्याच्या विविध बाबी विचारात घेतल्यानंतर ही यादी तयार करते. यामध्ये संरक्षण बजेट, आधुनिक शस्त्रे आणि सैनिकांची संख्या यासह अनेक घटकांच्या आधारे क्रमवारी निश्चित केली जाते. यावेळी पाकिस्तान सैन्याने 0.2083 चा स्कोअर प्राप्त केला आहे. त्याचबरोबर भारताचा स्कोअर 0.1214 आहे. अव्वल स्थानी विराजमान असलेल्या अमेरिकन सैन्याचा इंडेक्स 0.0721 आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे सर्वोत्कृष्ट रँकिंगसाठी स्कोअर 0.000 असला पाहिजे. ज्या देशाचा स्कोअर याच्या जितक्या जवळ असेल, त्या देशाची रँकिंग तितकीच चांगली होईल.

टॉप 10 शक्तिशाली सैन्याच्या यादीत भारतानंतर जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, ब्रिटन आणि ब्राझीलचा क्रमांक आहे. तथापि गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी पाकिस्तानच्या सैन्याने बरीच मजल मारली आहे. पाकिस्तानने इस्राईल, कॅनडा, इराण आणि इंडोनेशियाला मागे सोडून पाच स्थानांची झेप घेतली आहे. पाकिस्तान त्या 15 देशांपैकी एक आहे ज्यांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. अहवालानुसार पाकिस्तानच्या सैन्यात 1,204,000 सैनिक आहेत. त्याचबरोबर भारतीय सैन्यात 14 लाखाहून अधिक सैनिक तैनात आहेत.

पाकिस्तान आपल्या वार्षिक अर्थसंकल्पातील 7 अब्ज डॉलर्स संरक्षण क्षेत्रावर खर्च करतो. पाकिस्तानची आर्थिक स्थिती ठीक नसतानाही प्रचंड संरक्षण बजेटबाबत प्रश्न उपस्थित होत असतात. पाकिस्तानचे सैन्य तुर्की, इटली, जर्मनी, सौदी अरेबिया, स्पेन आणि ऑस्ट्रेलियापेक्षा पुढे आहे. तथापि, जर आपण भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याची तुलना केली तर सैनिकांच्या संख्येपासून ते शस्त्रास्त्रांपर्यंत प्रत्येक बाबतीत पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे आहे.