जायचे सत्संगाला अन् करायचे घरफोड्या, पोलिसांच्या लागले गळाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – सत्संग शिबीरात नाव नोंदवून भक्त म्हणून राहात सत्संगी विद्यार्थी असल्याचा बनाव करून सुट्टीच्या दिवशी घरफोड्या करणाऱ्या सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ११ लाखांचा ऐवज जप्त केले आहेत. त्यांच्याकडून एकूण २० गुन्हे उघड करण्यात आले आहेत. अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.
सागर दत्तात्रय भालेराव (२१, हडपसर), स्वप्नील नामदेव गिरमे(२४, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर भालेराव आणि स्वप्नील गिरमे हे दोघे मांजरी परिसरात राहण्यास आहेत. गिरमे याचे वडील कंडक्टर आहेत. दोघांचेही शिक्षण झाले नाही.

दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. कुटुंबियांनी त्यांच्यात काही बदल व्हावेत म्हणून त्यांना सत्संगासाठी आळंदी येथे दाखल केले होते. दोघांचीही नोंदणी करून ओळखपत्र देण्यात आले होते. दोघे सकाळी सत्संग करून दुपारी व रात्री तेथून पसार व्हायचे. त्यानंतर ते दोघे रात्रीच्या वेळी घरफोड्या व चोरी करत होते. हडपसर परिसरात होणाऱ्या घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले आहे.

त्यामुळे पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी आळंदीच्या सत्संगातून येऊन चोऱ्या करणारे दोघे सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केल्यावर दोघे सत्संगातून येऊन घरफोड्या करत असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी १३१ ग्रॅम सोने, ५ दुचाकी, १० मोबाईल, २ एलसीडी टिव्ही, १ कॅमेरा, २६ हजार रुपये रोख असा ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस क्रमचारी नितीन मुंढे, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, युसुफ पठाण, संपत अवचरे, गोविंद चिवळे, अकबर शेख, शशिकांत नाळे यांच्या पथकाने केली.