गोव्यात पुन्हा ‘रात्रीस खेळ चाले’ ; मगोपचे 2 आमदार फुटले, अख्खा पक्षच भाजपात विलीन

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन – मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर मध्यरात्री दोन वाजता प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पाडल्यानंतर आता महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीतील तीन पैकी दोन आमदार फुटले. त्यांनी मध्यरात्री दोन वाजता भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे भाजपमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला असताचे पत्र दिले. मगोपाचे उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर हे तिसरे आमदार आहेत. मात्र त्यांची या पत्रावर सही नाही. आजगावकर आणि पावस्कर यांनी आम्हाला दोन तृतीयांश बहमुत असल्याचे सांगितले.

पक्षांतर बंदी कायद्यानुसार, दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यामुळे मगोपाचे आमदार भाजपत आल्याने गोव्यातील भाजप सरकार आता स्थिर झाले आहे. विधानसभेत ३६ सदस्यांपैकी आता भाजपचे १४ सदस्य आहेत. याचवेळी प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रीपद दिले जाणार असल्याचा दावा दीपक पावस्कर यांनी केला आहे.

गोव्यात सरकार स्थापन करताना सुदीन ढवळीकर यांनी खूप आडवून धरले होते. त्यावेळी सरकार स्थापन करणे महत्वाचे असल्याने त्यांच्या सर्व अटी भाजपने मान्य करत त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले. मात्र, आता त्यांच्या पक्षातील इतर दोन्ही आमदारांना भाजपमध्ये घेऊन त्यांच्यावर डाव टाकला आहे. त्यामुळे आता ढवळीकर यांची उचलबांगडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.