मुख्यमंत्री सावंत यांचा मोठा निर्णय ! उद्यापासून गोव्यात 5 दिवसाचा Lockdown जाहीर

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात 5 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. उद्यापासून 29 एप्रिल ते 3 मे या कालावधीत हा लॉकडाऊन असणार आहे. यात गोव्यातील सार्वजनिक वाहतूक पूर्ण बंद राहील. मात्र उद्योगधंदे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कर्नाटकानंतर गोवा हे दुसरे भाजपशासित राज्य आहे, जिथे लॉकडाऊन केले आहे.

लॉकडाऊन काळात लोकांनी घाबरून जाऊ नये. सर्व अत्यावश्यक सेवा आणि किराणा मालाची दुकाने सुरु राहतील. स्थलांतरीत मजुरांनी राज्य सोडू नये असेही आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे. लोकांनी 5 दिवस कडक लॉकडाऊनचे पालन केले तर संसर्गाची साखळी तोडण्यात यश येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनची सविस्तर नियमावली लवकरच जाहीर केली जाईल. कॅसिनो, बार लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील. तर रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सुविधा सुरु राहील. अत्यावश्यक सेवांसाठी राज्यात ये- जा करण्यास परवानगी असेल असे सांगण्यात आले आहे.