गोव्याचे मुख्यमंत्री म्हणतात, ‘या’ पुढे फक्त 5 – 6 हजारच सरकारी नोकऱ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सरकारमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता यापुढे सरकार फक्त पाच ते सहा हजार एवढ्याच नोकऱ्या देऊ शकेल, असे  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. ताळगाव येथे सरकारच्या मजूर खात्यातर्फे शनिवारी आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

सध्या सरकारी खात्यात 55 ते 60 हजार इतके मनुष्यबळ आहे, त्यामुळे नवीन पदांसाठी कमी संख्येची आवश्यकता आहे तसेच सरकारी सेवेत काम असलेल्या मात्र काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवणार असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काम कमी करण्यासाठी अनेकांना सरकारी नोकरी सुरु करायची असते मात्र कामात कामचुकारपणा चालूंन घेणार नसल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, की सरकारकडे प्रचंड मनुष्यबळ आहे व यापुढे पाच-सहा हजार नोकऱ्या देता येतील. तरुणी-तरुणींनी सरकारी नोकरीच्याच मागे न धावता खासगी क्षेत्रात स्वत:चे करिअर घडवावे. त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील सुरक्षितता वाढावी म्हणून खाजगी क्षेत्राच्या व्यवस्थापनांशी बोलणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेल्या तरुणाने नोकरीच शोधत बसू नये. नोकरी जर मिळाली नाही तर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करायला हवा आणि त्याने दुसऱ्याला नोकरी द्यायला हवी.

कारवार किंवा सिंधुदुर्गमधील दहा हजारपेक्षा जास्त तरुण-तरुणी गोव्यातील उद्योगांमध्ये काम करतात. यापूर्वी सरकारने मानव संसाधन विकास महामंडळ स्थापन केले व त्या महामंडळामार्फत सरकारला सुरक्षा रक्षक पुरवले जात आहेत. पँकिंगच्या कामासाठी देखील हे महामंडळ मनुष्यबळ पुरवू शकणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. यावेळी मंत्री जेनिफर मोन्सेरात, सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नाडिस, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व्यासपीठावर उपस्थित होते.

अ‍ॅप्टिटयूड चाचणी सक्तीची होणार
गोव्यात बुद्धिमत्ता आहे मात्र प्रत्येकजण नोकरीच्या मागे लागलेला आहे. त्यामुळे आयटी कंपन्या अभिनव कल्पना राबवू शकतील असे मनुष्यबळ देखील कोकणात आहे. ज्यात शिक्षण झाले आहे त्यात नोकरी येथील तरुण करत नाही कारण अ‍ॅप्टिटयूड चाचणी आणि करिअर गायडन्स इथल्या तरुणाईला माहित नाही. त्यामुळे दहावी बारावी नंतर अ‍ॅप्टिटयूड चाचणी आणि करिअर गायडन्स इथल्या तरुणांसाठी सक्तीचे केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.