गोव्याच्या उपमुख्यमंत्री पदासाठी ‘हे’ दोन घटकपक्ष अडून…  

पणजी : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले . दरम्यान , गोव्याच्या नवीन मुख्यमंत्री पदासाठी डॉ.  प्रमोद सावंत यांच्या नावाला भाजपप्रणीत आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी अजुनही मान्यता दिलेली नाही . तसेच , दोन घटकपक्ष उपमुख्यमंत्री पदासाठी आडून बसल्याचे समोर आले आहे.

काल संध्याकाळी दुःखद बातमी आली .  त्या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली . गोव्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले . दरम्यान , मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच त्यांचे निधन झाले असल्याने मुख्यमंत्री निवडीचा पेच भाजपपुढे पडला आहे . याचदरम्यान , मुख्यमंत्रीपदासाठी साखळीचे आमदार प्रमोद सावंत , आरोग्य मंत्री विश्वजित राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यात स्पर्धा होती . राणे व तेंडुलकर यांचे नाव मागे पडले व भाजपच्या संघटन मंत्र्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रमोद सावंत यांच्याकडेच भाजपचे व सरकारचे नेतृत्व सोपवावे असे ठरविले . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याविषयी मगो पक्षाचे प्रमुख नेते सुदिन ढवळीकर व फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा केली पण ढवळीकर व सरदेसाई यांनी आपल्याला उपमुख्यमंत्रीपद दिले जावे , अशी अपेक्षा व्यक्त केली .

मात्र गोव्यासारख्या छोटय़ा राज्यात दोन पक्षांना उपमुख्यमंत्रीपदे कशी काय देता येतील , असा प्रश्न भाजपा समोर उपस्थित झाला आहे .  विशेष म्हणजे , भाजपमध्ये रविवारी रात्री दीड वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत बराच खल झाला . गडकरी व सुदिन ढवळीकर यांच्यात तर दोन बैठका झाल्या . दोन घटक पक्ष व अपक्ष मिळून एकूण नऊ बिगरभाजप आमदार आहेत . या नऊ आमदारांच्या मागण्या व अटी भाजपला मान्य झालेल्या नाहीत . त्यावेळी जो पर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आम्ही प्रमोद सावंत यांच्या नावाला मान्यता देऊ शकत नाही .  असे घटक पक्षांनी म्हंटले आहे.