शेतात बकऱ्या गेल्याच्या कारणावरून एकाचा खून, दोघांंना अटक

जालना : पोलीसनामा ऑनलाईऩ –   मोसंबीच्या शेतात बक-या घुसल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने आणि दगडाने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील काजळा (ता. बदनापूर) शिवारात सोमवारी (दि. 29) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

संजय पुंजाराम मांगडे (35 रा. बुटेगाव ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विठ्ठल गरड व बद्री उर्फ मन्नू गरड असे अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मृताचा भाऊ रमेश पुंजाराम मांगडे याच्या फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, बुटेगाव येथील संजय मांगडे आणि संदीप सुदाम गवारे व सोमनाथ तुकाराम जाधव हे तिघे मिळून सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बकऱ्या चार होते. यावेळी त्यांच्या बकऱ्या बाजूलाच असलेल्या काजळा शिवारातील विठ्ठल गरड यांच्या मोसंबीच्या शेतात गेल्या. मोसंबीच्या शेतात बकऱ्या घुसल्याचा राग आल्याने विठ्ठल गरड व बद्री उर्फ मन्नू विठ्ठल गरड या दोघांनी संदीप व सोमनाथ यांना शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी बद्री उर्फ मन्नू गरड याने संजय याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार फटका दिल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या छातीत मोठा दगड मारला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे, सहपोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी विठठल गरड व बद्री उर्फ मन्नू गरड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे तपास करीत आहेत.