CAA : …तर ‘गोध्रा’सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, भाजप मंत्री

बंगळुरु : वृत्तसंस्था – सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशातलं वातावरण पेटलं असताना आता राजकीय नेत्यांमध्ये वाकयुद्धाला सुरुवात झाली आहे. बहुसंख्याकांनी संयम गमवल्यास गोध्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा भाजपचे नेते आणि कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री सी.टी. रवी यांनी दिला आहे. कर्नाटकात सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यास राज्य पेटेल, असे विधान काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यू.टी. खादेर यांनी केले होते. यावर रवी यांनी उत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते खादेर यांच्या विधानाचा संपर्क देताना रवी यांनी जोरदार टीका केली. याच मानसिकतेतून गोध्रात रेल्वे पेटवण्यात आली आणि कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले. पण त्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरादाखल काय घडलं याची खादेर यांना कल्पना असेल. गोध्र्यात रेल्वे जाळण्यात आल्यानंतर लोकांनी काय केले, हे खादेर यानी पाहिले असेल. जर ते गोध्र्यातील ती घटना विसरले असतील, तर आम्ही त्यांना त्याची आठवण करुन देऊ, असा धमकीवजा इशारा रवी यांनी दिला आहे.

बहुसंख्यांक शांत आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्या भागांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात, अशा शब्दात रवी यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे लक्ष केले. परिस्थिती चिघळवू पाहणाऱ्यांना त्यांनी यावेळी थेट इशाराच दिला. बहुसंख्याकांनी संयम राखला आहे म्हणून तुम्ही परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न करत आहात. गोध्रातील घटना आठवून पाहिल्यास आमचा संयम संपल्यावर काय होतं ते तुम्हाला कळेल. आमच्या संयमाला आमचा कमकुवतपणा समजू नका, असे रवी यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/