देवापुढील दान हे ट्रस्टचेच उत्पन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाविकांकडून देवासमोर अर्पण केलेल्या पैशांमध्ये कोणत्याही खाजगी व्यक्तीस हक्क सांगता येणार नाही अथवा हिस्सा घेता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी दिला आहे. देवापुढील थाळी अथवा गुप्तदान पेटीमध्ये अर्पित उत्पन्न हे पूर्णपणे त्या मंदिराच्या ट्रस्टची मिळकत असून त्या रकमेचा विनियोग त्या देवस्थानच्या उद्दिष्टांसाठी व भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी करण्यास संबंधित ट्रस्टचे विश्वस्त जबाबदार आहेत.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या रांजणगाव गणपती येथील पुजारी प्रसाद व मकरंद कुलकर्णी यांनी श्री महागणपती समोर थाळीमध्ये अर्पण केलेली रक्कम पूर्णत: त्यांना घेण्याचा हक्क आहे असे दिवाणी न्यायालयाने घोषीत करावे असा दावा दाखल केला होता.देवासमोरील थाळीतील उत्पन्न कोणी घ्यावे याबाबत मोठा वाद उत्पन्न झाला होता. त्यानंतर शिरूर तालुक्याचे तहसीलदार यांचे मध्यस्थीने सर्वसंमत्तीने गाभाऱ्यासमोर स्वतंत्र गुप्तदान पेटी ठेवण्यात आली.

या पेटीतील उत्पन्न स्वतंत्र बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. हे सर्व उत्पन्न पुजारी म्हणून वैयक्तिकरित्या घेण्याचा हक्क आहे असा कुलकर्णी बंधूंनी दावा केला होता. तसेच दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत ही रक्कम घेण्यास देवस्थान ट्रस्टने हरकत करू नये अशी अंतरीम मनाई मागितली होती. दिवाणी न्यायालयाने पुजाऱ्यांना दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत दरमहा पंचवीस हजार रुपये ट्रस्टने द्यावेत व गाभाऱ्यासमोर ठेवलेल्या गुप्तदान पेटीतील देणगी रकमेचा वापर करण्यास ट्रस्टला मनाई केली होती.

केवळ पंचवीस हजारच नाही तर गुप्तदान पेटीतील पूर्ण रक्कम मिळावी यासाठी कुलकर्णी बंधूंनी या निकालाविरुद्ध पुणे जिल्हा न्यायालयात अपील केले होते. तर देवासमोर भाविकांनी अर्पण केलेल्या दानपेटीतील रक्कम ही ट्रस्टची मिळकत असून त्यांवर कोणीही वैय्यक्तिकरित्या हक्क सांगू शकत नाही यासाठी देवस्थानने ट्रस्टचे वकील ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांचेमार्फत या निकालाला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते.जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी  यांचेसमोर दोन्ही बाजूंनी प्रदीर्घ युक्तिवाद करण्यात आला.

पुजाऱ्यांतर्फे त्यांना ग्रामजोशी म्हणून मिळालेल्या तत्कालीन इंग्रज  सरकारच्या सनदेनुसार वतन जमिनी व देवाचे पुजारी म्हणून हे सारे उत्पन्न घेण्याचा हक्क असल्याचा युक्तिवाद केला.
देवस्थान ट्रस्ट तर्फे त्याचे खंडन करताना ट्रस्टचे वकील ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देऊन जिल्हा न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले की देवापुढे अर्पण केलेले दान हे संबंधित देवस्थान ट्रस्टची मिळकत असून त्यांवर कोणीही वैय्यक्तिक हक्क सांगू शकत नाही. या रकमेचा विनियोग केवळ देवस्थानचे उद्दीष्ठांसाठी करून त्याद्वारे तेथे येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सोई सुविधा पुरविण्यासाठी करण्यात यावा असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे.

त्याचप्रमाणे देवस्थानचे धार्मिक विधी व रुढीपरंपरांचे पालन तसेच दैनंदिन पूजाविधी करण्यासाठी तेथील पुरोहितांना योग्य मानधन देता येईल, मात्र देवापुढील उत्पन्नामध्ये कोणालाही वैय्यक्तिक हक्क सांगता येणार नाही असे या देवास्थान ट्रस्टच्या १९४२ साली तेंव्हाच्या दिवाणी न्यायालयाने तयार केलेल्या धटनापत्रात आदेशित केल्याचे जिल्हा न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व दाखल कागदपत्रांच्या आधारे जिल्हा न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा पुजाऱ्यांना देवापुढील दानातून दरमहा पंचवीस हजार ट्रस्टने देण्याच्या निकाल रद्दबातल करून देवापुढील दान हे देवस्थान ट्रस्टचे उत्पन्न असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल निकाल दिला आहे.
देवस्थान ट्रस्टना दिलासादायक निकाल : ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार (देवस्थान ट्रस्टचे वकील) :-
पूर्वीच्या काळी देवस्थाने वतनदार  व्यक्तींच्या ताब्यात असताना तेथील उत्पन्न वैय्यक्तिकरित्या घेतले जात असे. त्यातून देवस्थानांचा विकास होत नसे. १९५० साली ट्रस्ट कायदा अंमलात आल्यानंतर अशा सर्व सार्वजनिक देवस्थानांची नोंदणी होऊन विश्वस्त मंडळाची संकल्पना अस्तित्वात आली.

त्यानुसार अशा सर्व सार्वजनिक देवस्थानांच्या स्थावर व जंगम मिळकतींच्या व्यवस्थापनाची जबाबदारी विश्वस्त मंडळाचे दायित्व झाले. विश्वस्त मंडळाने या सर्व उत्पन्नाचे सुनियोजन करून करून भाविकांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा प्राधान्याने व सोई पुरविणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे ट्रस्टचा अतिरिक्त संपत्ती शैक्षणिक मदत, धर्मादाय रुग्णालय, दुष्काळ निवारण, पाणी पुरवठा अशा  समाज उपयोगी कामांसाठी वापरात आणला पाहिजे. या निकालामुळे मंदिराच्या विश्वस्तांना व्यापक सामाजिक कार्यासाठी निधी उपलब्ध होईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us