मध्यमवर्गीयांना दिलासा दिला – योगेश गोगावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मध्यमवर्गीयांच्या आणि सेवा निवृत्तांच्या अनेक वर्षांच्या मागण्यांचा विचार करुन त्यांना दिलासा देणारे अंदाजपत्रक केंद्र सरकारने मांडले आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली.

समाजातील सर्व घटकांना, सर्व क्षेत्रांना स्पर्ष करुन केंद्र सरकारने आपल्या प्रामाणिक भावनांचे प्रतिबिंब मांडले आहे. पुणे हे मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त, आर्थिकदृष्ट्या उपेक्षित असणाऱ्यांना आपलेसे वाटणारे शहर आहे. या शहरातील हजारो लोकांना या अंदाजपत्रकाने दिलासा मिळाला आहे. आयकराची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढवावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती ती या अंदाजपत्रकाने पूर्ण केली आहे. व्यक्तिगत ठेवींवरील व्याजावर भविष्याचा आराखडा आखणाऱ्या सेवानिवृत्तांचा विचार अंदाजपत्रकात करण्यात आला आहे ही विशेष बाब म्हणावी लागेल. ठेवींवरील टीडीएसची मर्यादा दहा हजार वरुन चाळीस हजारांवर नेऊन सेवानिवृत्तांना दिलासा दिला आहे.

असंघटित वर्गाला सहा हजार पर्यंतच्या बोनसची तरतूद करुन याही वर्गाला अंदाजपत्रकात दिलासा दिलेला आहे. कामधेनू योजना मांडून सरकारने आपल्या समाजाच्या आरोग्याचा विचार केला आहे. आपल्या देशातील गोधनाचे संवर्धन, वृद्धी करुन शास्त्रीय दृष्टिकोन सरकारने जपला आहे. त्याद्वारे देशी गायींच्या दुधाचा वापर वाढेल आणि आरोग्य राखण्यास मदत होईल असे गोगावले यांनी सांगितले.

देशाच्या सुरक्षेचाही केद्र सरकारने विचार करुन आजपर्यंतची सर्वात मोठी आर्थिक तरतूद संरक्षण खात्यासाठी केली आहे.

सर्वसमावेशक अशा या अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री पियुष गोयल, अरुण जेटली यांचे आम्ही अभिनंदन करतो असे गोगावले म्हणाले.