7 दिवसांपासून चालू असलेल्या तेजीला ब्रेक ! ‘सोनं-चांदी’ झालं स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या प्रकोपानंतर सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. परंतु आज मागील आठवड्याच्या तेजीनंतर सोन्याच्या दरात घट झाली आहे. गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याने मंगळवारी कमॉडिटी बाजारात सोनं 584 रुपयांनी स्वस्त झालं. MCXवर सोन्याचा दर 42,996 रुपयांपर्यंत आला आहे.

मागील पाच दिवसात कमॉडिटी बाजारात सोनं 3000 रुपयांनी महागलं होतं. सोमवारी सोनं कमॉडिटी एक्सचेंजमध्ये 43,036 रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. यात एक टक्क्यांनी वाढ दाखवली गेली होती. परंतु आज गुंतवणूकदारांनी जोरदार नफा वसुली केली. ज्यामुळे MCX वर सोनं 1.34 टक्क्यांनी आणि जागतिक कमॉडिटी बाजारात 1 टक्क्यांनी घसरले. MCX वर सोन्याचा दर 42,996 रुपये झाला आहे.

आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोन्याचे दर सोमवारी 2 टक्क्यांनी वाढले होते. सोनं 1678.58 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झालं. चीनमधील कोरोना व्हायरस अशियाच्या इतर देशात पसरु लागल्याने आशियातील अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट उभं आहे. याच कारणाने जगभरातील गुंतवणूकदारांनी याचा धसका घेतला आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदीकडे वळले आहेत. परंतु मंगळवारी सोनं 1642.89 डॉलर झालं. MCX वर चांदी 1.6 टक्क्यांनी घसरुन 48,580 रुपये झाली.

इंडियन बुलियन असोसिएशनच्या आकडेवारीनुसार सोमवारी स्टॅण्डर्ड सोन्याचा दर 1840 रुपयांनी वाढून 43,415 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर शुद्ध सोनं 1848 रुपयांनी वाढून 43,590 रुपये झाले. सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरात तब्बल 1430 रुपयांनी वाढ झाली. तर दिवस अखेर चांदीचे दर 49,035 रुपये प्रति किलोग्रॅम राहिले.

You might also like