खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरवाढीला लागला ‘ब्रेक’, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोन्याचे दर वेगाने वाढले. गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 56191 रुपयांवर गेला होता. मात्र त्याला नफेखोरांची नजर लागली. सोन्याच्या दरात शुक्रवारी एक हजारांची घसरण झाली. आज (मंगळवार) पुन्हा एकदा सोन्यात नफावसुली झाल्याने सोन्याचा भाव 1050 रुपयांनी कमी झाला आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 53 हजार 896 रुपये आहे.

कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. आज सोने 1050 रुपयांनी घसरले आहे. मागील तीन पैकी दोन सत्रांमध्ये झालेल्या घसरणीने सोने दोन हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज चांदीच्या भावात तब्बल तीन टक्के घसरण झाली आहे. बाजारात चांदीचा भाव 2400 रुपयांनी कमी झाला असून तो एका किलोला 72 हजार 976 रुपयांवर ट्रेड करत आहे.

इंडियन बूलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार आज शुद्ध सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 54 हजार 528 रुपये आहे. 23 कॅरेटचा भाव 54 हजार 310 रुपये असून चांदीचा भाव एक किलोला 72 हजार 354 रुपये आहे. सराफांकडून सोन्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), घडणाळ मजुरी आकारले जातात. त्यामुळे प्रत्यक्षात सोन्याचे दागिने खरेदी करताना सोन्याच्या किंमतीत 4 ते 5 हजारांची वाढ होते.

सोन्याच्या किमतीत सोमवारी 0.35 टक्क्यांची वाढ झाली होती. तसेच चांदीचा भाव दोन टक्क्यांनी वाढला होता. सोमवारी चांदी 1500 रुपयांनी महागली होती. भारतातच नाही तर जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. डॉलरचे मूल्य वधारत असल्याने मौल्यवान धातूची झळाळी कमी झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत यंदा 35 टक्के वाढ झाली आहे. मागील सहा महिने जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनाने जखडून ठेवल्याने भांडवली बाजारातील गुंतवणुकीला मोठा फटका बसला आहे. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे वळत आहेत.